शेतकरीपुत्रांच्या लग्नासाठी अनोखा मेळावा

शेतकऱ्याचे आयुष्यही सुखी असू शकते. याबाबत अलीकडच्या काळात फारसे बोलले जात नाही. केवळ नोकरी, आधुनिक रहाणीमान याच्या प्रभावाखाली चांगल्या व उच्चशिक्षित शेतकरी वराला सहजपणे नकार दिला जात आहे. हे चित्र टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमात उच्चशिक्षित मुलींनीही नाव नोंदणी केली आहे. हा उपक्रम इतरांसाठीही एक आदर्श ठरून सर्वच समाजांनी याची प्रेरणा घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - अर्चना मगदूम, संयोजिका
शेतकरीपुत्रांच्या लग्नासाठी अनोखा मेळावा
शेतकरीपुत्रांच्या लग्नासाठी अनोखा मेळावा

कोल्हापूर : अलीकडच्या काळातील ‘पॉश’ जीवनशैलीला भुलून तरुणी ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ असे म्हणत प्रगतशील शेतकरी वरालाही नाकारत असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र सध्या आहे. शेतकरी स्थळे नाकारणाऱ्या युवतींचा गैरसमज दूर करण्यासाठी वीर सेवा दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत मेळावे, बैठकांच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात मोहीम राबवली आहे. या अंतर्गत ८ एप्रिलला मलिकवाड (जि. बेळगाव) येथे शेतकरी वर निवडण्यासाठी जैन शेतकरी वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी एखाद्या समाजाने मेळाव्याचे आयोजन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजामध्ये शेतकऱ्यांना नाकारणाऱ्या मुलींमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी युवकांचे मोठे नुकसान होत आहे. नोकरदारापेक्षा चांगली आर्थिक स्थिती असली तरी तो केवळ शेती करतो, असे सांगत शिकलेल्या तरुण शेतकऱ्यांनाही नाकारण्यात येते ‘लग्नाच्या बाजारात’ शेतकरी वराला सर्वात तळाचे स्थान मिळत आहे. हे लक्षात घेऊन जैन समाजामध्ये काम करणाऱ्या वीर सेवा दल या संघटनेने शेतकरी वरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. असे उपक्रम राबविल्यास इतर समाजांनाही तो दिशादर्शक ठरून शेतकरी नवऱ्याबाबत वाढत चाललेली उदासीनता दूर होइल या उद्देशाने हे प्रयत्न सुरू करण्यात आले. मुलींबरोबर पालकांच्या अवास्तव अपेक्षांही कमी करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे हा मेळावा घेण्यात येणार आहे. पारंपरिक मेळाव्यापेक्षा याचे वेगळे स्वरुप आहे. जर एकाच गावांतून जादा संख्येने विवाहोच्छुक मुली यात सहभागी होणार असतील त्यांच्यासाठी मेळाव्यास्थळी येण्यासाठी त्यांच्या गावापर्यतचा सगळा प्रवास खर्च संयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. या मेळाव्यात अनुरूप जोडीदार निवडला गेला, तर त्याच्या लग्नासाठी संयोजन समिती पूर्ण मदत करणार आहे. मुलींची नोंदणी सुरू आहे. यासाठी बाळासाहेब पाटील, रावसाहेब कुन्नूरे, अजित भंडे, अभय करोले आदींसह कार्यकर्त्यांची फळी परिश्रम घेत आहेत. दिगंबर जैन मंडळ मलिकवाड, वीर महिला मंडळ, भारतीय जैन संघटना, आदी संघटना यासाठी सहकार्य करीत आहेत. बैठकांद्वारे जागृती महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांतील प्रत्येक गावांमध्ये सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी समाजमंदीरात बैठका घेऊन मुलींच्या पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. हे प्रबोधन करताना समाजातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथाही मांडण्यात आल्या. केवळ राहणीमानात सुधारणेपेक्षा आरामदायी व सुखकर, समाधानी जीवन शेतकरीच देऊ शकतो, याची उदाहरणे देत अनेक पालकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com