खोल मशागतीतून जमीन मोकळी करण्याकडे कल
खोल मशागतीतून जमीन मोकळी करण्याकडे कल

खोल मशागतीतून जमीन मोकळी करण्याकडे कल

नाशिक : लागवडीसाठी जमीन तयार करणे, हा द्राक्षपट्ट्यात परवलीचा मंत्र ठरू लागला आहे. पोकलँड यंत्रापुढे दीड मीटरपर्यंत खोल जाणाऱ्या दात्यांनी संपूर्ण जमीन विंचरून काढली जाते. यामुळे जमिनीत वर्षानुवर्षे तयार झालेले क्षारांचे पट्टे मोकळे होऊन जमिनीत हवा खेळती रहाण्यास मदत होत आहे. चर्चासत्रांमध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना जमीन मोकळी करण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर या विभागांत द्राक्ष लागवडीअगोदर खोल मशागत करून जमीन मोकळी करण्याकडे कल वाढला आहे.  पिंपळगाव बसवंत येथील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अनंत मोरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांत द्राक्ष शिवारात लागवडीची पद्धत बदलली आहे. पहिल्यांदा जमिनीची हलकी मशागत केल्यानंतर नांगराचे तास आणि चर पाडून ठराविक अंतराने खड्डे करून रोप लागवडीची पद्धत होती. त्यामुळे झाडाची मुळी खोलवर न जाता उथळ राहते. परिणामी मुळीच्या वाढीला मर्यादा येतात. त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो.        एकाच जमिनीत हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांच्या मुळांच्या रचनेनुसार सिंचन पद्धती बदलली जाते. त्याच्या परिणामी जमिनीच्या प्रत्येक थरात क्षारांचे पट्टे तयार होतात. क्षारांच्या अडथळ्यामुळे पाणी खोलपर्यंत झिरपण्याला मर्यादा आली आहे. क्षारांच्या अडथळ्यांमुळे पुरेसा ऑक्‍सिजन मुळांपर्यंत जात नाही. जमिनीत हवा खेळती रहात नाही. हे लक्षात घेता क्षारांचे थर फोडून जमीन सच्छिद्र करणे महत्त्वाचे अाहे. पोकलँडच्या पुढे एक ते दीड मीटरपर्यंतचे दाते जोडून संपूर्ण जमीन उभी- आडवी खोल नांगरल्यामुळे क्षारांचे थर मोकळे होतात. मागील दोन वर्षांपासून शेतकरी या नव्या मशागत तंत्रज्ञानाकडे वळले आहेत.    गेल्या काही वर्षांपासून राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या चर्चासत्रात चिली, दक्षिण अफ्रिका, पेरू, अमेरिकेतील द्राक्ष तज्ज्ञांनी ‘जमिनीचे आरोग्य’ या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. बहुतांश बागायतदारांना कमी उत्पादनाची समस्या जाणवत आहे. यामुळे बागायतदारांनी जमीन व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. मागील आणि यंदाच्या द्राक्ष लागवड हंगामात बागायतदारांमध्ये नवीन मशागत तंत्रज्ञानाची चर्चा रंगली. विदेशातील द्राक्ष तज्ज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञ आणि राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी नाशिक, सांगली भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग घेतले. यातून क्षार तसेच इतर कारणांनी कडक झालेल्या जमिनीची खोल मशागत करून मोकळी करण्याची आणि नवी सिंचन पद्धती बसविण्याची गरज आहे, हे समोर आले. या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम समोर येत असताना यंदा होणारी बहुतांश लागवड नव्या मशागत तंत्रज्ञानाच्या साह्याने होत आहे. मशागत तंत्रज्ञानात चिली अग्रेसर  चिलीमध्ये मागील अनेक वर्षांपासून खोल मशागत केल्यानंतर जमीन तयार करून मगच द्राक्ष लागवड केली जाते. चिली येथील द्राक्ष तज्ज्ञ ऑस्कर सलगाडो यांनी सुरवातीला भारतीय द्राक्ष उत्पादकांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. संघाच्या चर्चासत्रात अनेकदा यावर त्यांनी सादरीकरण केले. चिली येथील रॉड्रिगो ऑलिव्ह यांनी ‘जमिनीचे आरोग्य आणि  त्यासाठी योग्य सिंचन पद्धती'' यावर विशेष भर दिला आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत द्राक्ष उत्पादन १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्याचे बागायतदार सांगतात. चिली, दक्षिण अफ्रिकेतील खोल मशागत तंत्रज्ञानाने भारतीय द्राक्ष बागायतदारांना नवा दृष्टिकोन दिला आहे. यामुळे या आधीच्या तुलनेने कमी खर्चात द्राक्षाची चांगली गुणवत्ता मिळणे शक्‍य झाले आहे. - अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे जमिनीची तयारी हा दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचा पाया आहे. सक्रिय आणि मजबूत मुळीचे आरोग्य अबाधित ठेवणे, पाण्याचा गरजेनुसार वापर यावर बागायतदार भर देत आहेत. खोल मशागत तंत्रज्ञानाने द्राक्ष शेतीला नवी दिशा मिळाली आहे. - सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com