कृषी प्रगतीसाठी चारसूत्री तंत्रज्ञान आवश्यक : किरण कुमार

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभामध्ये बारामती कृषी महाविद्यालयाच्या कु. आरती आनंदराव बोरस्ते या विद्यार्थिनीस सुवर्णपदक प्रदान करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभामध्ये बारामती कृषी महाविद्यालयाच्या कु. आरती आनंदराव बोरस्ते या विद्यार्थिनीस सुवर्णपदक प्रदान करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव.

राहुरी : कृषी पदवीधरांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांनी आत्मविश्वासाने भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे. या पुढील काळात जैवतंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या योग्य समन्वयातून भारतीय शेतीची प्रगती होईल, असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) अध्यक्ष श्री. ए. एस. किरण कुमार यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बत्तिसाव्या पदवीप्रदान समारंभात दीक्षांत भाषणात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी  व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार शिवाजी कर्डिले, आमदार प्रकाश गजभिये, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार राहुल जगताप, डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते. श्री. किरण कुमार पुढे म्हणाले की, कृषी पदवीधरांनी नेहमी आपल्या समोर भारताची गेल्या दोन दशकांतील कृषी  प्रगती, अन्नधान्याबाबतीत देशाची स्वयंपूर्तता, भारतीय शेती क्षेत्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय आणि यासाठी आपले काय योगदान राहील, या दृष्टिकोनातून कार्य करावे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या समन्वयातून आज देशाचे अन्नधान्य उत्पादन २७० दशलक्ष टनावर पोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून व भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाच्या माध्यमातून कृषी हवामान, अंतराळ आणि जमीन यावर आधारित निरीक्षणातून कृषी उत्पादनाचा अंदाज घेण्यात येईल. यामध्ये गहू, भात, ज्वारी, कपाशी, भुईमूग, मोहरी या पिकांच्या उत्पादनाचा समावेश आहे. त्याचबरोबर ‘चमन’ या प्रकल्पाअंतर्गत उपग्रहाच्या मदतीने आंबा, लिंबूवर्गीय पिके, केळी, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि मिरची या पिकांच्या क्षेत्राचा आणि उत्पादनाचा अंदाज घेण्यात येणार आहे. कुलपती श्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते ७३ विद्यार्थ्यांना पीएचडी, ३४६ विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व ३३६५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान झाल्या. बीएस्ससी (कृषी) पदवीत आरती बोरस्ते, बीएस्ससी (उद्यान विद्या)मध्ये पूजा औटी, कृषी अभियांत्रिकीमध्ये अशोक गिरगुणे यांना सुवर्णपदक प्रदान केले.  कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या पदवीच्या शिक्षणात पाच झाडांची लागवड व संगोपन करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करत आहोत. संशोधन कार्याचा विचार केला तर आजपर्यंत विद्यापीठाने विविध पिकांचे २५७  वाण, ३४ कृषी यंत्र व औजारे आणि एकूण १४०० तंत्रज्ञान शिफारशी केलेल्या आहेत. आरती बोरस्ते चार सुवर्णपदकांची मानकरी बारामती ः बारामतीच्या कृषी अभ्यासक्रमाची उच्च गुणवत्ता सिद्ध करताना येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बारामती कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती आनंदराव बोरस्ते हिने बीएस्सी अॅग्री पदवीत राहुरी कृषी विद्यापीठात सर्वप्रथम व बारामतीच्याच नीलम बोरकर हिने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे. आरतीने पदवी परीक्षेत चार सुवर्णपदकांसह सात विशेष पुरस्कार मिळवले आहेत. आरतीने ९२.४० टक्के गुण मिळवून विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळवताना पीकशास्त्र व कृषी विस्तार विषयात दोन विशेष पुरस्कार मिळवले. नीलमने पदवी परीक्षेत ९०.३० टक्के गुण मिळवले. घींच्या भरीव यशाबद्दल अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षण संचालक प्रा. एन. ए. नलावडे यांनी आरतीचे कौतुक केले. राजेंद्र पवार म्हणाले, की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला व्यवहारिक व वास्तवदर्शी, कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठीचा असलेला आग्रह विद्यार्थ्यांच्या यशातून दिसतो. यापुढील काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात उच्च गुणवत्ता संपादन केली पाहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com