उत्तर प्रदेशातील उसाच्या ‘एसएपी’त तीन टक्क्यांनी वाढ

उसाचे राज्य निर्धारित मूल्य
उसाचे राज्य निर्धारित मूल्य

लखनौ, उत्तर प्रदेश ः उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या (२०१७-१८) हंगामासाठी उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (एसएपी) तीन टक्क्यांनी वाढ केली अाहे. तसेच उसाचे संपूर्ण बिल शेतकऱ्यांना कारखान्याकडून एक हप्त्यात दिले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांच्या सरकारने घेतला अाहे.

ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशने देशात अाघाडी घेतली अाहे. ऊस हे येथील प्रमुख पीक अाहे. येथील ४० लाख शेतकरी कुटुंबे ऊस शेती करतात. उसाचे राज्य निर्धारित मूल्य वाढविल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना १,०६० कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळणार अाहे.

विविध ऊस वाणाच्या निर्धारित मूल्यात केलेली वाढ ही प्रतिक्विंटलमागे १० रुपयांनी अाहे. गेल्या हंगामात उसाच्या सर्वसाधारण ऊस वाणासाठी प्रतिक्विंटल ३०५ रुपये राज्य निर्धारित मूल्य होते. त्यात अाता १० रुपयांनी वाढ करून ते प्रतिक्विंटल ३१५ रुपये निश्चित केले अाहे,

तर लवकर परिपक्व होणाऱ्या ऊस वाणाचे मूल्य प्रतिक्विंटल ३२५ रुपये निश्चित केले अाहे.   विशेषतः उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात ऊसदराचा प्रश्न हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. गेल्या काही वर्षांत उसाचे मूल्य वाढविण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांनी अांदोलने केली अाहेत. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य निर्धारित मूल्य वाढविले अाहे. कारखान्यापर्यंत ऊस पोचविण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात सवलत देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. 

...हा तर शेतकऱ्यांवरील अन्याय ः समाजवादी उसाच्या निर्धरित मूल्याच्या मुद्यावरून विरोधी समाजवादी पक्षाने टीका केली अाहे. ‘‘केवळ दहा रुपये ऊस मूल्य वाढविणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय अाहे. याअाधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्यावरून मूर्ख बनविले. अाता उसाच्या निर्धारित मूल्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली अाहे. यावरून राज्य सरकार शेतकरी प्रश्नी असंवेदनशील असल्याचे दिसून येते,’’ अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी राज्य सरकारवर टीका केली अाहे. दहा दशलक्ष टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट यंदाच्या हंगामातून १० दशलक्ष टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट उत्तर प्रदेश सरकारने ठेवले अाहे. गेल्या वर्षी ८.७५ दशलक्ष टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे साखर उत्पादनाचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी अधिक अाहे.

विधानसभेसमोर ऊस जाळून केले अांदोलन

उत्तर प्रदेश सरकारने उसाचे निर्धारित मूल्य प्रतिक्विंटलमागे केवळ १० रुपयांनी वाढविल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य विधानसभेसमाेर शनिवारी (ता. २८) निदर्शने केली.

या वेळी शेतकऱ्यांनी ऊसपीक जाळून अांदोलन केले. उसासह बटाटे, भाताला योग्य हमीभाव देण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात अाले.

शेतकऱ्यांनी विधानसभेकडे जाणारा रस्ता अडवून धरणे अांदोलन केले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सुरक्षारक्षकांचा मोठा फौजफाटा बोलावून दोन तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात अाला.

उसाचे राज्य निर्धारित मूल्य केवळ दहा रुपयाने वाढवून भाजप सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला अाहे. योगी अादित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालविली असून, हे सहन केले जाणार नाही, असा इशारा भारतीय युनियनचे हरिनाम सिंग वर्मा यांनी दिला अाहे.

उसाचे निर्धारित मूल्य प्रतिक्विंटल ४५० रुपयांपर्यंत वाढवायला हवे. तसेच भात अाणि बटाट्याची किमान अाधारभूत किंमत अनुक्रमे प्रतिक्विंटल २,५०० रुपये, १,००० रुपये असायला हवी, अशी मागणी त्यांनी केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com