प्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धन

प्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धन
प्राथमिक प्रक्रियेतून मूल्यवर्धन

आजच्या शेतीच्या बहुतांश समस्या या कापणी-मळणीनंतर सुरू होतात. योग्य वेळी काढणी, प्रतवारी, प्राथमिक प्रक्रिया, स्टॉक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाजारभाव - या सर्व प्रक्रियांत आज बहुसंख्य शेतकरी खूपच मागे आहेत. वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्याला आठ-दहा टनांच्या शेतीमालासाठी एवढा सरंजाम उभा करणे शक्य नसते. हेच काम जर शेतकऱ्यांच्या वतीने एखाद्या संस्थेने सुरू केले, तर मोठे परिवर्तन घडू शकते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीस्थित गोदावरी व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर्स लि. (गोदा फार्म) अशाच प्रकारचे काम उभे केले आहे. गोदा फार्मने हरभरा, सोयाबीन आणि हळद या तीन पिकांत प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रियेचे काम सुरू केले आहे. सध्या कळमनुरी येथे हरभरा आणि सोयाबीन प्रत्येकी ८० टन प्रतिदिन, तर हळदीचे ६० टन प्रतिदिन क्षमतेचे प्राथमिक प्रक्रियेचे युनिट कार्यान्वित आहे. गोदा फार्मच्या खरेदी युनिटवर दररोज भाव जाहीर केला जातो. मोबाईल एसएमएसद्वारे सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना मोफत बाजारभाव पाठवला जातो. माल आणण्यापूर्वीच शेतकऱ्याला दर माहिती असतो. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाते. सोयाबीन आवक झाल्यावर क्लीनिंग युनिटद्वारे त्यातील माती आणि काडीकचरा दूर केला जातो. मालाचे पारदर्शक प्रक्रियेद्वारे वजन होते आणि त्यानंतर पेमेंट केले जाते. आजघडीला गोदा फार्मचा दर हा मराठवड्यातील बेंचमार्क दर म्हणून ओळखला जातो. जे शेतकरी गोदा फार्ममध्ये माल आणू शकत नाही, ते देखील एसएमएस दाखवून खेडा खरेदीतील व्यापाऱ्याकडे संबंधित दराची मागणी करतात. यामुळे ऑइल मिल्स आणि खेडा खरेदीतील व्यापाऱ्यांनाही आपला दर गोदा फार्मनुसार उंच ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते. खेडा खरेदी किंवा बाजार समित्यातील सोयाबीन खरेदीत आणि गोदा फार्मच्या खरेदी प्रक्रियेत मूलभूत फरक आहे. वरील दोन्ही घटक माती काडीकचऱ्यासह माल खरेदी करतात. तथापि, एक टक्का खराब घटकांच्या बदल्यात बाजारभावात मोठी किंमत शेतकऱ्याला चुकवावी लागते. पडत्या भावात माल विकावा लागतो. एक किलो फॉरिन मॅटर (माती आणि काडीकचरा) आहे, म्हणून ९९ किलो मालाची बोली बेंचमार्क क्वालिटीच्या तुलनेत पाच ते आठ टक्क्यांनी खाली असते. गोदा फार्मने येथे एक गुणात्मक बदल घडवला. शेतकऱ्यासमोरच त्याच्या सोयाबीनमधील काडीकचरा दूर सारून आधी ठरल्याप्रमाणे बेंचमार्क बाजारभाव देण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत या रूपाने भर पडली आहे. सोयाबीनप्रमाणेच हळद आणि हरभऱ्यातही ग्रेडनुसार बाजारभाव ही संकल्पना विकसित केली आहे. हळदीच्या बाबतीत एकाच वर्षांत सकारात्मक परिणाम दिसला. चांगल्या ग्रेडच्या हळदीच्या उत्पादनात वाढ दिसली आहे.  गोदा फार्मने ग्रामीण विकासाचे एक इंटिग्रेटेड प्रारूप उभे करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. उदा. हार्वेस्टिंगनंतरच्या पायाभूत सुविधा जशा उभा गेल्या आहेत, तशाच पेरणीपूर्व ते कापणी-मळणीच्या दरम्यानच्या गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेसची एक प्रणाली विकसित केली आहे. हळद, सोयाबीन आणि हरभरा पिकासंदर्भात सातत्याने पीक प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे, त्याद्वारे व्यवस्थापनात, पीकसंरक्षणात गुणात्मक सुधारणा घडवण्याचे काम केले जातेय. हजारो शेतकऱ्यांना याद्वारे मोफत प्रशिक्षित केले जात आहे. कोणत्याही पिकाचे गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादनवाढीतील सर्व अडथळे दूर केले पाहिजेत, या प्रमुख सूत्रावर शेतकऱ्यांना सजग केले जाते. उदा. सोयाबीनच्या गुणवत्तापूर्ण उत्पादकता वाढीत निकृष्ट बियाणे हा मोठा अडसर आहे. सोयाबीन क्रशिंग उद्योगाला ज्या गुणवत्तेच्या सोयाबीनची गरज असते, तशाच प्रकारचे उत्पादन घेण्याचा कल आहे. त्यासाठी या वर्षी हिंगोली जिल्ह्यात ४०० एकरावर बीजोत्पादन घेण्यात आले आहे. म्हणजे पुढच्या वर्षी गोदा फार्मकडे स्वत:चे बियाणे उपलब्ध असेल. बियाणे बरोबरच खते, अवजारे औषधांचे स्वतंत्र विक्री केंद्र कंपनीने सुरू केले आहे. आज त्याची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये पोचली आहे. साधारपणे खुल्या बाजाराच्या तुलनेत गोदा फार्मकडील निविष्ठा, अवजारे ही दहा ते तीस टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतात. या माध्यमातून मोठी बचत साधली जाते. एखाद्या गावाची निविष्ठांची खरेदी जर एक कोटीची असेल आणि त्यातील १० लाख रुपये जरी वाचत असतील, तर तेवढे पैसे गावाच्या अर्थकारणासाठी उपयोगात आले, हे लक्षात घेतले पाहिजे. गोदा फार्मने आर्थिक, शैक्षणिक, पीकपाणीविषयक पाहणी केलीय. आज थेट सहा हजार शेतकरी थेट जोडले गेले आहेत. प्रक्रिया युनिट्स, निविष्ठा विक्रीतून थेट शंभर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हळद, हरभरा आणि सोयाबीनच्या प्राथमिक प्रक्रियेनंतर त्यांची विक्री थेट एंड यूजर्सला केली जाते. गुणवत्तापूर्ण मालामुळे देशभरातील नामांकित कंपन्या गोदा फार्मसमवेत जोडल्या गेल्या आहेत. बांधापासून ते एंड यूजर्स या प्रक्रियेत शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्यावतीने काम करणारी कंपनी म्हणून गोदा फार्मने आज ओळख तयार केली आहे. विशेष म्हणजे, गोदा फार्मचे मॉडेल कोणत्याही तालुक्यात गावांत रूपांतरित करता येण्यासारखे आहे. आजही प्राथमिक प्रक्रिया, क्लीनिंग, ग्रेडिंग आदी प्रकारचे कामे तालुक्याला दोन-चार व्यापारी प्रतिष्ठाने पूर्वापार पासून करत आहेत. तेच काम आज शेतकरी कंपन्या करू लागल्या आहेत. गोदा फार्म याचे उत्तम उदाहरण आहे. वार्षिक तत्त्वावर जो नफा होतो, तो गोदा फार्म शेतकऱ्यांना वितरित करते. यामुळे या कंपनीची विश्वासार्हता वाढली आहे.  (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com