‘वायू’ चक्रीवादळ होणार तीव्र

हवामान
हवामान

पुणे : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता वायू चक्रीवादळ गोव्यापासून नैर्ऋत्येला ३५० किलोमीटर, मुंबर्इपासून नैर्ऋत्येकडे ५१०, तर  गुजरातच्या वेरावळपासून ६५० किलोमीटर दक्षिणेकडे हे वादळ घोंगावत होते. मंगळवारी रात्री उशिरा या वादळाचे तीव्र वादळात रूपांतर होईल, ताशी ११५ ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेल्या वादळामुळे गुरुवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे, उंच लाटा, मुसळधार पाऊस पडणार असल्याने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.  गुरुवारी (ता. १३) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. वादळामुळे घरांची पडझड होणे, वीज आणि संदेशवहन यंत्रणा बंद पडणे, पूर येणे, झाडे, झाडाच्या फांद्या पडणे, केळी, पपई या पिकांसह किनारपट्टीय भागात असलेल्या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे थांबवणे, किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, घराबाहेर न पडणे यांसह सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मॉन्सूनला चाल मिळणार? नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करीत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यापर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी मॉन्सूनने आणखी प्रगती केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावमुळे मॉन्सूनला किनारपट्टी भागात चाल मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत (ता.१३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com