स्मार्ट शेती भाजीपाल्याची

नवी पिढी शेतीत बी.एस्सी. ॲग्री झालेले कुटुंबातील नव्या पिढीचे देवेंद्र यांनी भाऊ राहुल यांच्यामदतीने सुधारित शेतीची आखणी सुरू केली. त्यातूनच शेतीचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली
एकमेकांच्या साथीने शेलार बंधूंनी शेती यशस्वी केली आहे.
एकमेकांच्या साथीने शेलार बंधूंनी शेती यशस्वी केली आहे.

वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून बाजारपेठेतील जोखीम कमी करणे, कलिंगडात मिरची, तसेच भेंडीत चार ते पाच पिके घेत उत्पादन खर्च कमी करणे, जोडीला दुग्धव्यवसाय. अशी अत्यंत स्मार्ट पद्धतीची एकात्मिक शेती देलवडी (जि. पुणे) येथील शेलार कुटवंबाने उभी केली आहे. बहुवीध पीक पद्धतीच्या या रचनेतून कुटुंबाने उंचावलेली शेती व कौटुंबिक अर्थकारण उल्लेखनीय म्हणावे लागेल.   पुणे जिल्ह्यातील दौंड हा मुख्यतः ऊस, भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील देलवडी येथील गोरखनाथ यशवंत शेलार यांनी पुणे येथे खासगी कंपनीत २८ वर्षे नोकरी केली. वडिलोपार्जित जमीन कमी असल्याने पडीक जमीन खरेदी करून विकसित करायची आणि विकायची, असे काम सुरू झाले. सन २००७ मध्ये देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे चौदा एकर जमीन खरेदी केली. भीमा नदी असल्याने उपसा सिंचन योजनेचा लाभ घेतला. विहीर व दोन बोअरवेल्स घेतल्या. सन २००९ नंतर उसाची निवड केली.  नवी पिढी आली शेतीत  दरम्यान, ‘डेअरी डिप्लोमा’ पूर्ण केलेल्या कुटुंबातील राहुल यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. उसाचा कालावधी, दर व हाती येणारे पेमेंट हे सारे न जुळणारे गणित होते. बी.एस्सी. ॲग्री झालेले कुटुंबातील नव्या पिढीचे देवेंद्र यांनी भावाच्या मदतीने सुधारित शेतीची आखणी सुरू केली. त्यातूनच शेतीचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली.  भेंडी ठरले महत्त्वाचे पीक  भेंडी पीक व हंगाम निवड ही महत्त्वाची बाब ठरल्याचे देवेंद्र सांगतात. नोव्हेंबरमध्ये भेंडी लावल्यास ती जानेवारीत सुरू होते. त्या वेळी थंडी असल्याने बाजारात आवक कमी असते. त्यामुळे किलोला ४० रुपयांपर्यंत दर मिळतात. २० गुंठ्यांत मल्चिंग पेपर वापरलेल्या प्लॉटमध्ये दोन टन उत्पादन मिळते.  खर्च वसूल करणारी आंतरपिके  भेंडीच्या दोन बेडमधील सुमारे आठ फूट जागेत मेथी, कोथिंबीर, शेपू, लसूण, दुधी भोपळा ही आंतरपिके घेत वाहतुकीचा व काही निविष्ठांचा खर्च भरून काढला. भाज्यांना चांगला दर मिळाल्याने पावणेदोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. भाजीपाला पिकांमध्ये कमी काळात उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्याचे आणि ताजा पैसा हाती येत असल्याचे लक्षात आले.  कलिंगडात मिरची  फेब्रुवारी २०१७ मध्ये एक एकर पाच गुंठ्यांत कलिंगडाची आठ बाय दीड फुटावर झिकझॅक’ पद्धतीने लागवड केली. बेडवर आंतरपीक म्हणून हिरवी मिरची (प्रत्येकी दोन फुटांवर) सरळ पद्धतीने घेतली. कलिंगड निघेपर्यंत त्याच पाणी आणि खतांवर मिरचीचे उत्पादन सुरू झाले. कलिंगडाचे एकूण क्षेत्रात  ४० ते ४२ टन उत्पादन मिळाले. ग्रेड व आकारानुसार किलोला ९, ७ रुपये दर मिळाले.  पावणेदोन लाख रुपये नफा मिळाला. मिरचीतून ८० हजार रुपये हाती आले. त्यास दर २५ रुपये प्रतिकिलो मिळाला. यातून मिरचीवर लक्ष केंद्रित करायचे ठरले.  वर्षातून तीन वेळा मिरची 

  • जुलै, ऑक्टोबर व जानेवारी अशी तीन वेळा मिरची 
  • एक प्लॉट संपत येताना दुसरा काढणीस 
  • रोपे तयार करून त्यांची लागवड. 
  • दोन वेळा नांगरणी. त्यात एकरी सात ते आठ ट्रॉली शेणखत. 
  • मल्चिंग पेपरचा वापर 
  • थंडी आणि उन्हाळ्याचा विचार करून झिकझॅक पद्धतीने प्रत्येकी दीड ते दोन फुटांवर लागवड. 
  • झाडे वाढण्यास मोकळी जागा देण्याचा प्रयत्न. अंतरानुसार एकरी साडेचार हजार ते सात हजार २०० रोपे बसतात. 
  • एकरी २२ टनांपर्यंत उत्पादन. त्यासाठी एकरी ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च. 
  • यंदा थंडी जास्त असल्याने उत्पादन सुरू होण्यास अवधी. 
  • विक्री 

  • दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात विक्री. पोत्यात भरून नेल्यास मालाला उठाव कमी होऊन दरही कमी मिळतो. याउलट दहा किलोचे छोटे पॅकिंग असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी. 
  • ताज्या मिरचीला सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर 
  • पुण्यापेक्षा स्थानिक बाजारात अधिक दर 
  • कमी अंतरावर आणि घरच्या वाहनातून वाहतूक केल्याने तो खर्च वाचतो. 
  • अन्य मालाची मुख्यत: दौंड आणि पुणे बाजारात विक्री 
  • अन्य शेती 

  • सध्या एक एकर क्षेत्रावर शेवगा. त्यात भोपळा, कोथिंबीर, हरभरा आंतरपिके 
  • अर्धा एकर- कारले, दोडका, घोसावळे, 
  • दीड एकर- कलिंगड, पपईचे नियोजन 
  • बाकी गहू, मका, चारा. उर्वरित क्षेत्रात घर, गोठा 
  • ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर, रेजर, कल्टिव्हेटर, जनरेटर संच ही उपकरणे 
  • सुमारे १० एकरांत ठिबक 
  • गोरखनाथ यांना पत्नी सुमन, सुना प्राजक्ता, रूपाली यांची शेती व दुग्ध व्यवसायात मदत 
  • दुग्धोत्पादनासंबंधी 

  • सन २०१३ मध्ये शेलार यांच्याकडे १५ गायी, पाच म्हशी होत्या. पशुखाद्याचे वाढते दर, दूध दरातील घट यामुळे अर्थकारण बिघडले. यातच भाजीपाल्याकडे कल वाढल्याने तिकडे जास्त वेळ द्यावा लागला. मात्र, शेणखत उपलब्ध होत असल्याने दुग्धव्यवसाय बंद करूनही चालणार नव्हता. केवळ गायी कमी केल्या. 
  • सध्या एकूण ११ गायी, दोन म्हशी 
  • दररोज सुमारे ६५ ते ७० लिटर दूध उत्पादन 
  • वर्षाला २४ ट्रॉली शेणखत. देशी गायीच्या शेण-मूत्रापासून जिवामृत 
  • चारा उपलब्धता 

  • एक एकरात हत्ती गवत. दोन एकरांत मका. त्यापासून वर्षभराचा मूरघास 
  • उसाचे वाढे दीडशे रुपये प्रतिशेकडा दराने घेतले जाते. 
  • दररोज ६० किलो मका चारा निर्मिती हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे. त्यामुळे अन्य पशुखाद्याची गरज कमी केली. 
  • संपर्क - देवेंद्र शेलार - ९४०४०४७६३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com