ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

पुणे : उत्तम वक्ते, साक्षेपी व व्यासंगी अभ्यासक, समाजवादाचे कट्टर समर्थक, माजी गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य (वय 90) यांचे पुण्यात निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोग झाल्याने ते गेले काही दिवसांपासून आजारी होते.

प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना सोमवारी (ता.26) उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान सोमवारी (ता.2) सायंकाळी साडेसातच्या वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ.अभिजित वैद्य यांचे ते वडील होत. 

काही दिवसांपूर्वीच भाई यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. सोमवारी (ता.26) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पोटात अचानक दुःखू लागले. त्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु वार्धक्‍यामुळे उपचाराला त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सोमवारी (ता.2) सकाळपासूनच ते बेशुद्धावस्थेत होते. उद्या मंगळवारी (ता.3) सकाळी त्यांच्या निवासस्थान येथून दांडेकर पूल येथील साने गुरुजी स्मारक येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी चार वाजता अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती डॉ. अभिजित वैद्य यांनी दिली. 

कुशाग्र बुद्धिमत्तेचे भाई वयाच्या नव्वदीतही राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. 1943 पासून राष्ट्र सेवा दलाचे सेवक झाले.1946 मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. 1955 मध्ये गोवा आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. 1962 ते 78 दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. 1974-75 दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते. 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला. पुलोद च्या सरकार मध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन (1978-80) सांभाळले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न,अंतुले सरकार विरोधी आरोपपत्र मोर्चा व सत्याग्रह, महागाई विरोधी सर्वपक्षीय धरणे यासारख्या विविध सामाजिक प्रश्‍नांना आंदोलनाव्दारे त्यांनी वाचा फोडली. अनेक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com