मोताळ्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’

अकोला ः ‘आयएसओ’ बनलेल्या पशू दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या सुविधा. व्यवस्थितपणे ठेवलेली औषधी आणि खासगी रुग्णालयाप्रमाणे बदलले अंतर्बाह्य स्वरूप.
अकोला ः ‘आयएसओ’ बनलेल्या पशू दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या सुविधा. व्यवस्थितपणे ठेवलेली औषधी आणि खासगी रुग्णालयाप्रमाणे बदलले अंतर्बाह्य स्वरूप.

अकोला : शासकीय रुग्णालये म्हटली की तेथील सेवा, सुविधांबाबत नेहमी नाकं मुरडली जातात. मग ही रुग्णालये माणसांची असो वा जनावरांसाठी उभारलेली. पण हे मत किमान मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्‍यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांबाबत तरी दूर ठेवावे लागेल. याचे कारण म्हणजे या तालुक्‍यातील संपूर्ण पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’ मानांकनाने गौरविण्यात आली आहेत.

एका तालुक्‍यात सर्वच दवाखान्यांनी आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा मान मिळवणारा मोताळा हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला आहे. बुलडाणा जिल्हा मुख्यालयाला लागूनच मोताळा तालुका आहे. या तालुक्‍यात मोताळा, पिंपळगाव देवी, तपोवन आणि धामणगाव बढे या चार ठिकाणी श्रेणी एकचे दवाखाने; तर शेलगाव बाजार, शेलापूर, तरोडा, रोहिणखेड आणि राजूर या पाच ठिकाणी श्रेणी दोनचे दवाखाने आहेत. हे नऊही दवाखाने आता आयएसओ दर्जाप्राप्त बनले आहेत.

मोताळा तालुक्‍यात सुरवातीपासूनच पशुधन अधिक असून, दुग्धोत्पादनात हा भाग अग्रेसर आहे. जनावरांची संख्या व त्यातही दुधाळ जनावरे अधिक असल्याने आरोग्यविषयक जागरूकता अधिक बाळगली जाते. त्यामुळे नागरिकांचा वारंवार पशू दवाखान्यांशी संपर्क येत असतो. या दवाखान्यांचे चित्र बदलण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले आणि त्याचे फळ ‘आयएसओ’च्या माध्यमातून मिळाले आहे.

हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी गुणवत्तापूर्वक तत्पर सेवा, ॲझोला, हायड्रोपोनिक, बहुवार्षिक चारापिके आदी वैरणांबाबत मार्गदर्शन, परिसराची स्वच्छता, इमारतींची अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी, ठिकठिकाणी माहितीपर भित्तिचित्रे, वृक्षारोपण, विविध उपदेशपर म्हणी, अद्ययावत रेकॉर्ड, नीटनेटके कार्यालय, शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, दवाखान्यात येणाऱ्या पशूंसाठी चारा, पाणी व्यवस्था, जनावराच्या मालकासाठी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी व्यवस्था अशा विविध निकषांवर या दवाखान्यांचे मूल्यांकन केले गेले.

आयएसओ प्रमापणपत्र देणाऱ्या पथकाने ऑगस्टमध्ये प्राथमिक व ११ आणि १२ सप्टेंबरला अंतिम तपासणी करून निकषांमध्ये हे दवाखाने बसल्याने ‘आयएसओ’ मूल्यांकन जाहीर केले. या पथकाने दवाखान्यातील सोयीसुविधांसोबतच पशुपालकांची मतेसुद्धा जाणून घेतली. त्यात समाधान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. हे कार्य सुरू असताना जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ. व्ही. बी. जायभाये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. सी. पसरटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एच. जयस्वाल, पशुधन पर्यवेक्षक डॉ. राजेश खोडके यांनी सातत्याने भेटी देऊन मार्गदर्शन केले.

यापूर्वी राज्य शासनाने राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा शुभारंभ मोताळा तालुक्‍यातून केला होता. तसेच या तालुक्‍याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एच. जयस्वाल यांना उत्कृष्ट कार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोनवेळा गौरविण्यातसुद्धा आले आहे.

तालुक्‍यातील पशुवैद्यकीय सुविधा अधिकाधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्वक बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तालुक्‍यात असलेल्या नऊही ठिकाणच्या पशुवैद्यकांनी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन सुसज्ज इमारती बनविल्या. ‘आयएसओ’मानांकन हे त्याचेच फलित म्हटले पाहिजे. हा यंत्रणांसोबतच तालुक्‍यातील नागरिकांचाही गौरव आहे. - डॉ. जी. एच. जयस्वाल, तालुका पशुधन विकास अधिकारी, मोताळा, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com