विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर होरपळले

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर होरपळले
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर होरपळले

पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची तीव्र लाट आली आहे. चंद्रपूर येथे देशाचे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर ब्रह्मपुरी व नागपूर उन्हाच्या झळांनी होरपळून निघाले आहे. विदर्भातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत (ता. २४) राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असून, गुरुवारपर्यंत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

चंद्रपूर, ब्रह्मपुरीमध्ये यंदा सातत्याने तापमान उच्चांकी पातळीवर आहे. रविवारी (ता. २०) ब्रह्मपुरी येथे ४७.१ तर नागपूर येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर येथे यापूर्वी १६ मे १९१२ राेजी आतापर्यंतच्या उच्चांकी ४८.३ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरीमध्ये २७ मे १९८३ राेजी ४७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. बुलडणा वगळता विदर्भातील सर्वच ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. नागपूर, वर्धा येथेही उष्णतेची लाट आली आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेडमध्येही उन्हाचा ताप असह्य होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा चटका अधिक आहे.

मॉन्सूनच्या अंदमान बेटांवरील आगमनास पोषक हवामान होत असून, बुधवारी (ता. २३) मॉन्सून अंदमानात धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात आलेले ‘सागर’ चक्रीवादळाने सोमालीयाच्या किनाऱ्याला धडक दिली असून, हे वादळ लवकरच निवळून जाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

रविवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, नगर ४२.८, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्वर ३१.७, मालेगाव ४२.६, नाशिक ३९.०, सांगली ३६.४, सातारा ३९.६, सोलापूर ४१.६, मुंबई ३४.७, अलिबाग ३८.६, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३६.८, आैरंगाबाद ४१.८, परभणी ४४.५, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४४.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४४.२, नागपूर ४६.२, वर्धा ४५.६, यवतमाळ ४४.५. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत ‘सागर’ चक्रीवादळ निवळते तोच अग्नेय अरबी समुद्रात रविवारी (ता. २०) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून मंगळवारपर्यंत (ता.२२) या भागात पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे चक्रीवादळ दक्षिण ओमान आणि उत्तर येमनच्या किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत. दक्षिण श्रीलंकेजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com