राज्य बँकेच्या मुख्य प्रशासकपदी विद्याधर अनास्कर

राज्य बँकेच्या मुख्य प्रशासकपदी विद्याधर अनास्कर
राज्य बँकेच्या मुख्य प्रशासकपदी विद्याधर अनास्कर

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकीय अध्यक्षपदी बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर (पुणे) यांची नियुक्ती राज्य शासनाने मंगळवारी (ता.५) केली. त्यांच्यासोबत संजय भेंडे आणि अविनाश महागावकर (सोलापूर) यांची सदस्यपदी कायम नियुक्ती ठेवण्यात आली आहे. सहकार आयुक्त कार्यालयाने या नियुक्तींचा आदेश जारी केला आहे.  शिखर बँक म्हणून राज्याच्या सहकारात राज्य सहकारी बँकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मागील काही वर्षांत आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे बँक आर्थिक दिवाळखोरीत गेली होती. गैरव्यवहारप्रकरणी बँकेचे तत्कालिन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार असलेल्या ७६ माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. संचालक मंडळाच्या काळात ३१ मार्च २०११ अखेर बँकेचे बुडीत कर्ज सुमारे २ हजार ९१९ कोटी इतके होते. तर, सन २०१० मध्ये बँक ७७५ कोटी रुपयांच्या तोट्यात होती. या आर्थिक गैरकारभारामुळे सन २००१ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. एम. एल. सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष; तर ए. ए. मगदूम आणि के. एन. तांबे हे सदस्य होते. त्या वेळी सुमारे दोन हजार कोटींच्या तोट्यात असलेली राज्य बँक प्रशासकीय मंडळाच्या कार्यकाळात नफ्यात आली आहे. मात्र, मधल्याकाळात फडणवीस सरकारने राज्य बँकेच्या प्रशासक मंडळावर विद्याधर अनास्कर, संजय भेंडे आणि अविनाश महागावकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. बँकेच्या कारभारातील अनावश्यक हस्तक्षेपामुळे डॉ. सुखदेवे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्यानंतर श्री. मगदूम आणि श्री. तांबे यांनीही आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाचा मार्ग आपसूकच मोकळा झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, मुख्य प्रशासकीय अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करून शासनाने बँकेवर स्वतःच्या मर्जीतील त्रिसदस्यांची नियुक्ती केली आहे. कर सल्लागार असलेले श्री. अनास्कर हे नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अ‍ॅण्ड क्रेडिट सोसायटी, नवी दिल्लीचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थांचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. तर, अविनाश महागावकर हे सोलापूरच्या लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक आहेत. लोकमंगल फाऊंडेशनचेही ते संचालक असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. सहकार, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com