राज्य बँकेला ३१६ कोटींचा नफा: विद्याधर अनास्कर

विद्याधर अनास्कर
विद्याधर अनास्कर

मुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात गरुडभरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बँकेला ढोबळ नफा ५६३ कोटी तर ३१६ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी (ता. १६) दिली.  राज्य बँकेने शेजारील कर्नाटक, आंध्रा आणि गुजरात राज्य सहकारी बँकांच्या एकत्रित व्यवसायाइतकी उलाढाल एकाच वर्षात करून हा उच्चांक गाठल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख उपस्थित होते.  अनास्कर पुढे म्हणाले, की राज्य बँकेला यंदा १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १५,८४० कोटी, कर्जे १९,७०० कोटी आणि एकूण व्यवसाय ३५,५४० कोटी इतका झाला आहे. बँकेच्या स्वनिधीतही भरभक्कम वाढ झाली आहे. बँकेचा स्वनिधी ४,००४ कोटींवर पोचला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून थकहमी पोटी मिळणाऱ्या १,०४९ कोटींमुळे स्वनिधी ५,००० कोटींवर जाणार आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार ४,००० कोटींच्या वर नेटवर्थ असलेल्या बँकांना शासकीय व निमशासकीय संस्थांकडून ठेवी स्वीकारता येणार आहेत.  संपलेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र या व्यापारी बँकेचा स्वनिधी ५,७३९ कोटी इतका होता. त्याखालोखाल राज्य बँकेचा स्वनिधी ५,००० कोटी इतका होत असल्याने नाबार्डच्या परवानगीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यासोबत आगामी काळात बँक रिटेल बँकिंग क्षेत्रातही उतरणार आहे. आर्थिक वर्षात बँकेने एकाही बुडीत कर्जाचे निर्लेखन केलेले नाही असेही त्यांनी सांगितले.  प्रशासक अस्तित्वात येण्यापूर्वी बँकेचा तोटा सुमारे १,१०० कोटींइतका होता. गेल्याकाळात हा तोटा भरून काढत बँकेने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा बँकेने ५६३ कोटी इतका ढोबळ नफा कमावला आहे. तर निव्वळ नफा ३१६ कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी २०१ कोटी निव्वळ नफा होता. त्यात यंदा भरीव वाढ झाली आहे. चालू वर्षात सात नव्या शाखा सुरू करणार आहे. जळगाव, उस्मानाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि यवतमाळ व वर्धा याठिकाणी या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच अडचणीतील वर्धा, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा बँका चालविण्यास घेण्याचा राज्य बँकेचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नाबार्डला पाठविण्यात आल्याचेही अनास्कर यांनी सांगितले.  राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची सुमारे २,३०० कोटींहून अधिकची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयातील दाव्यानंतर त्यापैकी १,०४९ कोटी थकहमी राज्य शासनाकडून बँकेला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले आहेत. थकबाकीची उर्वरित रक्कमही टप्प्याटप्प्याने बँकेला मिळेल, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात अवसायनातील सात सहकारी साखर कारखाने भाडेपट्टीने चालविण्यास देऊन देणे वसूल करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकल्याचे त्यांनी सांगितले.  येत्या काळात राज्य बँकेकडून राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्याचा विचार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले. या माध्यमातून सहकारी संस्थांमधील सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याद्वारे सहकार चळवळ बळकट करण्याचे बँकेचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  सोने तारण कर्ज पीककर्ज दाखवून व्यापारी बँकांची बनवाबनवी राज्यातील काही व्यापारी बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजावर सोनेतारण कर्ज देतात, त्यासाठी शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा घेतला जातो. सातबाराच्या आधारे संबंधित बँकांकडून हे कर्ज पीककर्ज दाखवले जाते. पीककर्जाला राज्य आणि केंद्र शासनाकडून साडेचार टक्के व्याज सवलत मिळते. ही व्याज सवलत शेतकऱ्याला न देता संबंधित बँकाच लाटत असल्याचे निदर्शनाला आले आहे. व्यापारी बँकांच्या या बनवेगिरीविरोधात राज्य सहकारी बँक जोरदार मोहीम उघडणार असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईसाठी राज्य शासनाकडे तक्रारही केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com