पुणे जिल्ह्यातील वीस गावे होणार पाणीटंचाईमुक्त

पाणी साठवण टाकी
पाणी साठवण टाकी
पुणे : पाणीटंचाई भासत असलेल्या पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये भूजल विभागामार्फत जलस्वराज्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या टप्प्यात वीस गावांमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित धातूच्या टाक्‍या उभारण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच या वीस गावांचा पाणीटंचाईमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरु होणार असून, गावातील नागरिकांना वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे. 
 
जिल्ह्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भागातील गावे, वाड्या वस्त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे ९० ते १२० दिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. यामुळे टॅंकर,बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. तीन ते पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून महिलांना पाणी आणावे लागत असलेली गावे, पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेली आणि वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी योजना असूनही उन्हाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावी लागणारी गावे या निकषाअंतर्गत वीस गावांची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे.
 
या गावात पारंपरिक सिंमेटच्या टाकीऐवजी नवीन तंत्रज्ञान आधारित धातूच्या टाक्‍या बसविणे प्रस्तावित आहे. या टाक्‍या पूर्वनिर्मित असून टंचाईग्रस्त गावांमध्ये योग्य जागेवर त्याची उभारणी करता येणार आहे. या टाकीचा बाहेरील भाग धातूचा आणि गंज प्रतिरोधक पन्हाळी असलेला आहे. 
 
आतील आवरण विशेष प्रकारच्या तीन थर असलेल्या साहित्याचे आहे. सध्या वीस गावांपैकी सहा गावांमध्ये या टाक्‍या उभारण्याचे कामे सुरू असून उर्वरित १४ 
गावांमध्ये लवकरच या धातूच्या टाक्‍या बसविल्या जाणार आहेत. 
 
याबाबत भूजल विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद देशपांडे म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलसाठी टाक्‍या उभारल्याचे चित्र यापूर्वी पाहावयास मिळत होते. पण हे तंत्रज्ञान महाग असल्याने त्यांचा फारसा विचार पाणी साठवणीसाठी होत नव्हता. परंतु आता पाच ते सात रूपये प्रतिलिटर इतक्‍या खर्चात टाकी उभारणी शक्‍य झाले आहे.
 
महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये अशा पद्धतीच्या टाक्‍यांचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. टाकीसाठी चौथरा आवश्‍यक असून एक ते दोन दिवसांत टाकीची उभारणी करता येते. धातूचे पत्रे नट बोल्टने जोडले जातात. टाकीच्या शेजारी पाच हजार लिटरची टाकी उभारण्यात येते. त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या टाकीचे आयुष्यमान जवळपास ४० ते ५० वर्षे एवढे असल्याने कायमस्वरूपी नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकतो. 
टाक्‍या बसविण्यात येत असलेली गावे, वाड्या-वस्त्या 
ः खेड ः गणेशखिंड, ठाकरवाडी, गणेशनगर, काळेचदरा, ठोकेवस्ती, दोरेवस्ती, पवारवस्ती, ठाकर वस्ती, कुंभारदरे,
भोर ः भूतोंडे, धारंबेवाडी, अशिम्पी, मुळशी ः खरब, मानदेव खडक, आंबेगाव ः म्हातारदरे, जुन्नर ः शेळकेमळा, संतवाडी,  तोमगीरेवाडी, वेल्हा ः खंदारेवस्ती, कुबातलवस्ती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com