लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’मध्ये वाढ

मतदान
मतदान

पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात ३७.४ टक्के मते मिळाली आहेत. भाजपची १९८० मध्ये स्थापना झाल्यापासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मतांचा वाटा मिळाला होता. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना, जनता दल (युनायटेड), शिरोमणी अकाली दल, अण्णा द्रमुक आदी प्रमुख पक्षांचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला एकत्रितरीत्या ४५ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला ३८ टक्के मते मिळाली होती. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र या लोकसभा निवडणुकीत १९.५ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत सुधारणा झालेली नाही. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मते आणि जागा पटकावल्या. तसेच, देशातील बहुतांश राज्यांत अस्तित्व निर्माण करून देशव्यापी आघाडी बनण्याकडे तिची वाटचाल सुरू आहे. अपवाद केवळ दक्षिण भारतातील तीन प्रमुख राज्यांचा.  तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश येथे या आघाडीचा वारू थांबवण्यात प्रतिस्पर्धी पक्षांना यश मिळाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला एक टक्काही मते मिळालेली नाहीत. केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या चार राज्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपला उत्तर प्रदेशात ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत, तर हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, चंडीगड व अरुणाचल या १३ राज्यांत भाजपने पन्नास टक्क्यांहून अधिक मते प्राप्त केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ४० टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली आहेत. भाजपला जम्मू आणि काश्मीरमध्ये ४६ टक्के, तेलंगणमध्ये २० टक्के, केरळमध्ये १३ टक्के, तर ओडिशात ३८ टक्के मते मिळाली आहेत. महाराष्ट्रात भाजपला २७ टक्के, तर पंजाबमध्ये १० टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे.  काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात केवळ सहा टक्के, तर बिहारमध्ये सात टक्के मते प्राप्त झाली. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला ४० टक्के मते मिळवता आली. काँग्रेसला तब्बल १७ राज्यांमध्ये एकही जागा मिळालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com