शेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रांची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रांची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रांची प्रतीक्षा

सांगली : जत तालुक्यातील तूर बाजारात आली तरी शासनाची खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. व्यापारी याचा फायदा घेऊन ४४०० ते ४७०० रुपये क्विंटल दराने तूर खरेदी करीत आहेत. केंद्र सरकारने तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ६७५ हमीभाव जाहीर केला. मात्र त्यापेक्षा क्विंटलमागे १ हजार २०० ते १ हजार तीनशे रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते आहे.

जत तालुक्यात ५ हजार ३० हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली. पण, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली. प्रतिहेक्टरी उत्पादनात घटदेखील झाली. शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासकीय यंत्रणा म्हणून नाफेड आणि भारतीय खाद्य निगमची स्थापना झाली. दरवर्षी शासनाने नाफेड व विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय गोदाम (सेंट्रल वेअर हाउस) येथे तूर खरेदी केंद्र सुरू असते. केंद्र सरकारने यंदा तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली. सन २०१८ मध्ये आधारभूत किंमत ५ हजार ४५० रुपये इतकी होती. 

यावर्षी २२५ रुपये आधारभूत किमतीत वाढ केली. आधारभूत किमतीने तूर खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदी केंद्रे सुरू नाहीत. पणन विभागाने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत, असा प्रस्ताव केंद्र सरकारला डिसेंबर महिन्यात पाठविला आहे. पण केंद्राने अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे शासनाच्या लाल फितीत हा प्रस्ताव अडकून पडला.      

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पैशाची गरज असल्याने तूर विकण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कमी दरात तूर खरेदी सुरू केली आहे. हा दर १२०० ते १३०० रुपये कमी आहे. 

आधारभूत किमतीचा दृष्टिक्षेप (दर क्विंटलमध्ये) 

वर्ष महाराष्ट्रातील दर कर्नाटकातील दर
२०१७ ५ हजार ०५०  ५ हजार ५००
२०१८ ५ हजार ४५० ५ हजार ९००
२०१९ ५ हजार ६५४  ६ हजार १२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com