अकोले तालुक्‍यातील वाकी धरण भरले

वाकी धरण भरले
वाकी धरण भरले

नगर ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यात पाऊस सुरू आहे. पाणलोटात पाऊस झाल्याने वाकी धरण भरले आहे. अकोले तालुक्‍यात यंदाच्या पावसाळ्यात भरलेले हे तिसरे धरण आहे. भंडारदरा धरणातही पाण्याची आवक होत आहे. गुरुवारी रात्री काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला होता. अकोले तालुक्‍याचा पश्‍चिम भाग वगळता जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पावसाळा सुरू होऊन आता महिना उलटत आला आहे. मात्र, अजूनही जिल्ह्याच्या बहुतांश भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्याला अजूनही फारसा वेग आलेला नाही. सुरवातीला झालेल्या पूर्वमोसमी आणि मध्यंतरी झालेल्या दोन दिवसांच्या पावसावर काही प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. तेही क्षेत्र पाऊस नसल्याने अडचणीत आले आहे. अजून काही दिवस पाऊस झाला नाही तर पेरलेल्या क्षेत्रावरही दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात आहे.

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात दरवर्षी जोरदार पाऊस असतो. यंदा त्या भागातही पावसाचा फारसा जोर नाही. या भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. मात्र, गुरुवारी रात्री पावसाचा जोर काहीसा कमी झाला. अकोले तालुक्‍यातील आंबीत आणि पिंपळगाव खांड हे धरण भरलेले असून गुरुवारी रात्री १२२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे वाकी धरण भरले आहे.

गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात ४०५ तर मुळा धरणात १८८ दशलक्ष फूट पाणी जमा झाले. अकोले तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे मुळा धरणातही पाण्याची आवक सुरू झाली आहे. पाथर्डी तालुक्‍यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. अकोले तालुक्‍यातील पाऊस (मिमी) - भंडारदरा २१, वाकी १८, पांजरे २५, रतनवाडी ५७, घाटघर  ६७, निळवंडे ९, कोतूळ  ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com