वारणा पाणी योजनेवरून शहरी आणि ग्रामीण संघर्षाची शक्‍यता

वारणा नदी
वारणा नदी
कोल्हापूर : वारणा नदीच्या पाणीपुरवठा योजनेवरून आता कोल्हापूर व सांगली दोन्ही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पिण्यासाठी पाणी द्यायचे नाही या भावनेतून वारणा काठावरील शेकडो गावांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इचलकरंजी शहरातील नागरिकांनीही सोमवारी (ता. १४) इचलकरंजी बंदचा इशारा दिल्याने आता शहरी व विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 
इचलकरंजी व ग्रामीण भागातील जनतेने हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केल्याने आता या योजनेचे भवितव्य काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाने परिस्थिती जर गांभीर्याने घेतली नाही तर काहीही घडू शकते, असे वातावरण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. 

इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. पण सदोष यंत्रणा व गळतीमुळे इचलकरंजीला कृष्णेचे पाणी पुरेसे होत नाही. इचलकरंजीला असणारी पंचगंगा नदी ही इचलकरंजीतील उद्योगधंद्यातील पाण्यामुळे दूषित झाली आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही. पंचगंगेचे दूषित पाणी व कृष्णेचे अपुरे पाणी पाहून वारणा नदीवरून पाणी आणण्याची योजना आखण्यात आली. शिरोळ तालुक्‍यातील दानोळी येथून ही योजना आणण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

 कोल्हापूर जिल्ह्यातील काही स्वच्छ नद्यांपैकी वारणा ही नदी पिण्याच्या पाण्यासाठी चांगली मानली जाते. या नदीच्या काठावर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावे आहेत. या गावांची शेतीची व पिण्याच्या पाण्याची तहान वारणा नदी भागवते. यामुळे वारणा नदीच्या काठावरील गावे बारमाही हिरवीगार झाली आहेत.
 
इचलकरंजी शहर हे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. याशिवाय उद्योगाला ही मोठ्या प्रमाणात पाणी लागते. जर इचलकरंजीला पाणी उपसायचे ठरविल्यास याचा फटका या गावांना बसू शकतो. या गावांमध्ये शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न उद्‌भवू शकतो. यामुळे या गावांनी या योजनेला कडकडून विरोध केला आहे. 
 
सध्या इचलकरंजी शहराला दोन नद्यांचे पाणी आहे. इचलकरंजीच्या प्रशासनाने तिकडच्या नद्या स्वच्छ न करता वारणा नदीकडे लक्ष केंद्रित केले आहे. तुम्ही तुमच्या नद्या घाण करून आमच्या स्वच्छ पाण्याकडे का येता असा सवाल या काठावरील गावांचा आहे. याच पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरण्याच्या यंत्रणा न वापरता सरळ स्वच्छ पाण्यासाठी वारणा नदीकडे यायचे असेल तर येऊ देणार नाही, या भूमिकेत ग्रामस्थ आहेत. या गावांच्या आरोपाकडे मात्र प्रशासनाकडे उत्तर नाही. पिण्याच्या पाण्याला नकार देणे चुकीचे आहे, असे सांगत इचलकरंजीच्या नागरिकांनी लढा तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. 

या योजनेच्या बांधकामाचा प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल दानोळीतील शंभरहून अधिक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने प्रशासनाच्या विरोधात ग्रामीण भागातून प्रचंड संताप आहे. एक तर आमच्या नद्यावर डोळा ठेवता आणि अडवले की आमच्यावरच कारवाई करता, असा सूर ग्रामस्थांचा असल्याने या गावात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठ दिवसांत हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांनी बंद, मोर्चा काढून योजनेविरोधी भावना व्यक्त केल्या आहेत. 

दोन्हीकडून जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू झाल्याने आता प्रशासनाची हा प्रश्‍न सोडविण्यासाठी कसोटी लागणार आहे. हा प्रश्‍न एका गावाचा राहिला नसून वारणा काठावरील शेकडो गावात याची दाहकता पसरत आहे. हिंसक प्रकार टाळून योजनेला सुरवात होते की लोकरेट्यामुळे ही योजना स्थगित करावी लागते, याचे उत्तर येणारा काळच देणार असल्याने आता संघर्ष टाळणे यालाच प्रथम प्राधान्य द्यावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com