पुणे विभागात ८८१ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. परंतु, पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या पुणे विभागातील ७३९ गावे आणि ४३७७ वाड्यावस्त्यांवर सुमारे ८८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

गेल्या वर्षी विभागातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, उपसा अधिक असल्याने भूजलपातळी झपाट्याने खालावली आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विभागात नोव्हेंबर, डिसेंबरपासून पाणीटंचाई भासू लागली. जानेवारीपासूनच अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली. गेल्या महिन्यापासून या भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे टॅंकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. विभागातील अनेक भागांत विहिरी कोरड्या पडू लागल्याने नागरिकांची सर्व भिस्त धरणांतील पाण्यावर आहे. 

सध्या विभागात खासगी ८३७ तर शासकीय ४४ टॅंकरद्वारे तब्बल १५ लाख ४१ हजार ९४४ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच दोन लाख २० हजार ६५३ जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागात सर्वाधिक पाणीटंचाई सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूरमध्ये सुमारे २६० टॅंकरद्वारे २३४ गावे व १४५७ वाड्यांवरील सुमारे पाच लाख ८ हजार ६०२ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई सुरू असून येथे ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहेत. जिल्ह्यात सुमारे २२७ टॅंकरने १९९ गावे व ८२७ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.  माण तालुक्यात सर्वाधिक १०७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हा या तालुक्यांत पाणीटंचाई आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ, तासगाव, मिरज, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुक्यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहेत.     

जिल्हानिहाय टॅंकरची संख्या व गावे, वाड्या 
जिल्हा टॅंकर  गावे  वाड्या
पुणे २०७ १२८  १००५ 
सातारा २२७ १९९ ८२७ 
सांगली १८७ १७८  १०८८
सोलापूर २६० २३४  १४५७
एकूण ८८१ ७३९ ४३७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com