‘जलयुक्त’च्या कामांमुळे सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये निवड झालेल्या १६० गावांपैकी अनेक गावशिवारातील विविध यंत्रणांमार्फत करण्यात येत असलेली जलसंधारणाची अनेक कामे अपूर्ण आहेत. यंदा जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामांमुळे निर्माण होणारा अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु कामे पूर्ण झालेल्या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी काही प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.

२०१६ -१७ या वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली होती. या गावांच्या शिवारामधील २३,८८२.०७ हेक्टरवर कृषी विभाग, लघुसिंचन जलसंधारण विभाग, लघुसिंचन (जिल्हा परिषद), ग्रामपंचायत, भूजल सर्वेक्षण, वन विभाग, सामाजिक वनीकरण, जलसंपदा विभाग आदी यंत्रणामार्फत करावयाच्या ६,७६८ कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता.

ही कामे पूर्ण झाल्यानंतर १,२१,४१.४७ टीसीएम पाणीसाठा निर्माण होणे अपेक्षित होते. अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला असता तर २४,२८२.७४ हेक्टर क्षेत्राला एका वेळ तर १२,१४१.३७ हेक्टर क्षेत्रासाठी दोन वेळ सिंचनासाठी संरक्षित पाणी उपलब्ध झाले असते.

जलयुक्त शिवार अभियानच्या २०१६-१७ च्या आराखड्यातील कामांपैकी १५,३७२.२१ हेक्टरवर ३,९८४ कामे पूर्ण झाली आहेत. अजून ८,५१० हेक्टरवरील ९२२ कामे अपूर्ण आहेत. १,२३३ कामांना अद्याप सुरवात झालेली नाही.

पूर्ण झालेल्या कामांमध्ये १,२९६० हेक्टरवरील ढाळीचे बांध, कंपार्टमेंट बंडिंगची ३०१ कामे, ४१६ हेक्टरवर सलग समतल खोल चराची १७ कामे,१० ठिकाणी माती नाला बांध, ७६ ठिकाणी अनघड दगडी बांध, ८०० शेततळी, ६५ सिमेंट नाला बंधारे, २४० रिचार्ज शाफ्ट, १८३ नाला रुंदीकरण आणि खोलीकरण, १ ठिकाणी लोकसहभागातून नाला खोलीकरण, रुंदीकरण, ३५ ठिकाणी शासकीय आणि ८९ ठिकाणी लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामांचा समावेश आहे.

अपूर्ण कामांमध्ये ८,४६० हेक्टरवरील १९२ ठिकाणची ढाळीच्या बांधाची १९२ कामे, ५० हेक्टरवरील ९ ठिकाणची खोल सलग समतळ चराची कामे, शेततळ्यांची १७३ कामे, सिमेंट नाला बंधाऱ्यांची १४७ कामे, विहीर पुनर्भरणाची २६७ कामे, रिचार्ज शाफ्टची ८० कामे, सिमेंट नाला बांध दुरुस्तीची २२ कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणाची ३३ शासकीय आणि १५ लोकसहभागातील कामे, गाळ काढण्याची १ ठिकाणची शासकीय तर ४ ठिकाणची लोकसहभागीतील कामे अशी एकूण ९२२ कामे अद्याप अपूर्ण आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांवर आजवर ३४ कोटी ५७ लाख २४ हजार रुपये निधी खर्च झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये मंगळवार (ता.२४) पर्यंत ७६४.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे; परंतु प्रत्यक्षात ५४६ मिलिमीटर म्हणजेच ७१.४ टक्के पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ६९.१ टक्के, जिंतूरमध्ये ६६.५ टक्के, सेलूमध्ये ८२.५ टक्के, मानवतमध्ये ७७.२ टक्के, पाथरीमध्ये ५६.८ टक्के, सोनपेठमध्ये ८६.५ टक्के, गंगाखेडमध्ये ६१.२ टक्के, पालममध्ये ५१.७ टक्के, पूर्णामध्ये ७५.२ टक्के पाऊस झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे निर्माण होणारा अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही.

दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये तसेच २०१६-१७ मध्ये पूर्ण झालेल्या कामांमुळे विहिरींच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. तसेच बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक गावांमधील शेतकऱ्यांना काही प्रमाणात रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com