मराठवाड्यात ५९८ गावांना ६४६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई
औरंगाबाद : मराठवाड्यात पाणीटंचाईची धग तीव्र होताना दिसते आहे. अनेक गावांमधील विहिरी तळाच्या दिशेने वाटचाल करीत असून ५९८ गाव-वाड्यांची तहान टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करून भागविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ६४६ टॅंकरची सोय करण्यात आली असून, १३७१ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
पाणीटंचाईची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्यात जाणवत आहे. जिल्ह्यातील ३७७ गावे व ४४ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी तब्बल ४५३ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. टॅंकरने मिळणारे पाणी मोजक्‍या स्वरूपात मिळत असल्याने अनेक गावांतील ग्रामस्थांना एकतर विकत घेऊन वा मिळेल तिथून पाणी आणून आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे.
 
जालना जिल्ह्यातील ५३ गावे व ५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गाव वाड्यांना ६१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील २० गावे व ५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या गावांना २६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील १३ गावे व दोन वाड्यांना १२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
गत आठवड्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, ४१ गावे व २९ वाड्यांची तहान टॅंकरने भागवावी लागत आहे. त्यासाठी ८६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सहा गावे व दोन वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गाव-वाड्यांना पाणी पुरविण्यासाठी सात टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
 
लातूर जिल्ह्यात एका गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मराठवाड्यातील ३९ तालुक्‍यांतील भूजलपातळीत घट नोंदली गेली आहे. याचाही थेट परिणाम पाणीटंचाईवर होतो आहे. कमी झालेला पाउसकाळ, भूजलाचा मोठ्या प्रमाणात होत असलेला उपसा, यामुळे भूजलपातळी झपाट्याने खालावत चालली आहे. 
 
तळ गाठत असलेल्या विहिरींमुळे पाणीपुरवठ्यासाठीच्या विहीर अधिग्रहणात झपाट्याने वाढ होते आहे. गत आठवड्यात १२५६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. ते आता ११५ ने वाढून १३७१ वर पोचले आहे. अधिग्रहित केलेल्या विहिरींपैकी ११०० विहिरी टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी तर ३१५ विहिरी टॅंकरला पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com