साताऱ्यात बारा हजारांवर कृषिपंपांची वीजजोडणी प्रलंबित

कृषीपंप
कृषीपंप
सातारा  ः पिके जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर महावितरण मीठ चोळत असून, शेतकऱ्यांना अनामत भरून वीजजोडणीसाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार २७८ कृषिपंपांची वीजजोडणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना ते देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
जिल्ह्यातील महावितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाने वीजपुरवठा, अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. कृषिपंप वीजजोडणीसाठी सुमारे १५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. महावितरणने वर्षभरात यापैकी केवळ २३२५ कृषिपंपांना वीजजोडणी दिलेली आहे. उर्वरित १२ हजार २७८ शेतकरी आजही वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अनामत भरूनही वीजजोडणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
खटाव तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजेच २५२६ वीजजोडणी प्रलंबित आहे. तसेच सातारा, कोरेगाव, फलटण, माण या दुष्काळी तालुक्‍यांमध्ये दीड हजारांवर वीजजोडणी प्रकरणे प्रलंबित आहेत. उपलब्ध पाणी असतानाही वीजजोडणी न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत.
याबाबत पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या खरीप आढावा बैठकीत प्रलंबित वीजतोडणी विषयी चर्चा झाली आहे. यावर कार्यवाही होऊन प्रलंबित जोडण्या कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कृषिपंपांचे वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास वीजतोडणीची कारवाई लगेच केली जाते. मात्र अनामत रक्कम भरून वर्ष उलटले तरी वीजजोडणी होत नसताना संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
वीजबिले थकली म्हणून अनेक गावांतील वीज बंद करण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले होते. त्यानुसार कारवाई सुरू झाली होती. मात्र सरकारने वीजपुरवठा खंडित करू नये असा आदेश दिल्याने ही कारवाई थांबली. व्यावसायिकांचे लाड पुरविणाऱ्या या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची वीजतोडणीची कारवाई लगेच होते; मात्र वीजजोडणीची कार्यवाही वर्षानुवर्षे तशीच ठप्प ठेवली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १२ हजार २७८ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसीठी अनामत रक्कम या कंपन्यांकडून बिनव्याजी वापरली जात आहे.
 
तालुकानिहाय कृषिपंप वीजजोडणी स्थिती
तालुका झालेली जोडणी प्रलंबित जोडणी 
सातारा १८५ १५३५
कोरेगाव २०७ १९३८ 
वाई २३६ १७४ 
महाबळेश्वर २१ १७ 
जावळी ११३ १८०
कऱ्हाड ५३२ १३११ 
पाटण ११५ ५६१ 
फलटण २४० १७६९ 
खंडाळा २०४ ४६९ 
खटाव ४०१ २५२६
माण ७१ १७९८.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com