पाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा

पाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा
येवला, जि. नाशिक  : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची म्हणावी तशी न झालेली कृपादृष्टी, परतीच्या पावसानेदेखील चांगलीच पाठ फिरवताना सरासरी पर्जन्यमानात पिछाडीवर गेलेला तालुका म्हणजे येवला. सध्या ढासळलेली भूजल पाणीपातळी बघता येवला तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील विशेषतः पालखेड डाव्या कालवा लाभक्षेत्रातील गावांमधील जनतेच्या नजरा या जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रासंगिक पाणी आरक्षणाकडे लागल्या आहेत.
 
अत्यल्प पावसामुळे येत्या काळातील संभाव्य टंचाईची दाहकता कमी व्हावी, पाण्यासाठी वणवण नशिबी येऊ नये, यासाठी पाणी आरक्षणावर नजर ठेवून असलेल्या तालुक्‍यातील ३४ गावांनी गावातील बंधारे, साठवण तलाव भरून देण्याच्या मागणीचे ठराव ग्रामसभेत केले आहेत. या ३४ गावांकडून येवला पंचायत समितीकडे आलेले ठराव अन्‌ तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले प्रस्ताव लक्षात घेता या गावांसाठी यंदा एकूण ५५६.८६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण करण्याची मागणी आहे.
 
येवला तालुक्‍याचा उत्तर पूर्व भाग हा तर पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला टंचाईग्रस्त भाग आहे. पालखेडच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उर्वरित भागाची अवस्था म्हणजे ‘पाणी मिळाले तर टंचाईवर काहीशी मात, नाहीतर संकट’ अशीच. त्यामुळेच दरवर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिना सुरू झाला की, तालुक्‍यातील जनतेची दरवर्षी नजर असते ती जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मंजूर केल्या जाणाऱ्या पाणी आरक्षणाकडे.
 
येवला तालुक्‍यातील पाटोदा, रायते, पारेगाव, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, बल्हेगाव/वडगाव बल्हे, पिंप्री, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव खुर्द, खामगाव, शेवगेधुळगाव, पुरणगाव, देवळाणे, सातारे, जऊळके, धामणगाव, भाटगाव, अंतरवेली, बोकटे, मातुलठाण, आंबेगाव, बदापूर, दुगलगाव, नागडे, पिंपळगाव लेप, अंदरसूल, पिंपळगाव जलाल, गवंडगाव, आडगाव चोथवा, नांदेसर, मानोरी, सुरेगाव रस्ता व अंगणगाव या ३३ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून यंदा गावासाठी पालखेड धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याची मागणी केली आहे. तर तालुक्‍यातील मुखेड गावाने यंदाही नांदूरमध्यमेश्वर (दारणा) मधून गावासाठी पाणी आरक्षण मागितले आहे. 
 
वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा यंदा अत्यंत कमी झालेला पाऊस लक्षात घेता येत्या एप्रिल व मे महिन्यात तालुक्‍याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे गावासाठी प्रत्यक्ष लागणारे पाणी व संभाव्य ५० टक्के तूट लक्षात घेऊन ३४ गावांमधील बहुतांशी गावांनी यंदा अधिक पाण्याची मागणी नोंदवली आहे.
 
पालखेड धरणातून पाणी आरक्षण मागणाऱ्या येवला तालुक्‍यातील ३३ गावांनी एकूण ४९६.८६ दशलक्ष घनफूट इतके पाणी तर मुखेड गावाने नांदूरमध्यमेश्वरमधून ६० दशलक्ष घनफूट पाणी मागितले आहे. तालुक्‍यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिकाचे कायमस्वरूपी पाणी आरक्षण व त्यातून मिळणारे पाणी वेगळे असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com