‘निळवंडे’तून आवर्तनाचा मुहूर्त टळला

निळवंडे प्रकल्पातून आवर्तन
निळवंडे प्रकल्पातून आवर्तन
नगर  ः प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी व भंडारदरा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी रविवारी (ता. ४) सायंकाळपासून आवर्तन सोडण्यात येणार होते. मात्र निळवंडे धरणाच्या दरवाजा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने या आवर्तनाचा मुहूर्त टळला आहे. 
 
पाटबंधारे विभागाने रविवारी पाणी सोडण्याचे पूर्ण नियोजन केले होते. मात्र, निळवंडे धरणाच्या दरवाज्याचे काम बाकी असल्याचे ऊर्ध्व प्रवरा धरणाच्या संगमनेर विभागाकडून सांगण्यात आले. हे आवर्तन टळल्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सुटण्यास आणखी चार ते पाच दिवस लागण्याची शक्‍यता आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.
 
निळवंडे धरणातून शेतीसाठी व प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा करण्यासाठी रविवारी (ता. ४) सायंकाळी सहा वाजता आवर्तन सोडण्यात येणार होते. त्यानुसार प्रथम कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यात येणार होते. नंतर त्यांनाच जोडून शेतीसाठी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन देण्यात येणार होते. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी हे आवर्तन अंदाजे १२ मार्चपर्यंत सुरू राहणार होते.
 
प्रवरा नदीवर ओझर बंधारा ते प्रवरासंगमपर्यंत १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. हे भरण्यासाठी साधारण १७०० ते १८०० दशलक्ष घनफूट पाणी लागते. त्यानंतर साधारण २५ दिवसांचे शेतीसाठीचे आवर्तन सुरू राहील. त्यासाठी साधारण ३५०० दशलक्ष घनफूट पाणीवापर होणार होता. हे आवर्तन साधारणपणे ४० ते ४५ दिवस चालणार होते. 
 
रब्बीच्या शेवटच्या आवर्तनाला जोडून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी आवर्तन देण्याचे नियोजन होते. परंतु त्या वेळी कोल्हापूर बंधाऱ्यात साधारण ५० टक्‍के पाणीसाठा शिल्लक होता. म्हणून ते मार्चमधील आवर्तनाला जोडून घेण्यात आले. उन्हाळ्यात शेतीसाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत.
 
रविवारी सकाळी भंडारदरा धरणात आठ हजार ७२० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात चार हजार ५५५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com