जळगावमधील नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई
पाणीटंचाई
जळगाव  ः जिल्ह्यात नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, अनेक मोठ्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठासंबंधी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. 
 
गिरणा, वाघूर नदीकाठालगतही पाणीटंचाई आहे. अर्थातच यंदा नद्या व नाले खळाळून वाहिलेल्याच नाहीत. भरपावसाळ्यातही काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवली. त्यात जळगाव तालुक्‍यातील देव्हारी व धरणगाव तालुक्‍यातील गावांमध्ये ही समस्या होती. सातपुडा पर्वतालहगतच्या गावांमध्येही पाणीटंचाई भासेल, अशी स्थिती आहे. पाण्याची काटकसर सुरू झाली असून, दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे. 
 
जिल्ह्यात सध्या १२ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. अमळनेर, बोदवड भागांत टॅंकर सुरू असून, जिल्हा परिषदेने निर्देशित उपाययोजनांमधून तात्पुरत्या पाणी योजनांसाठी कार्यवाही हाती घेतली आहे. जेथे विहिरी किंवा कूपनलिकांना पाण्याचे स्रोत मिळतील, तेथे काम हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासंबंधी मंजुरी दिली असून, जिल्ह्यात बोदवड, जामनेर, भडगाव, अमळनेर या भागांत तात्पुरत्या पाणी योजनांसाठी निधी वितरित केल्याची माहिती मिळाली.
 
जिल्ह्यात अमळनेर, पारोळा या भागांत पाण्याची समस्या अधिक असणार आहे. हा अवर्षणप्रवण भाग असून, पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. अमळनेरातील गडखांब, नगाव भागांतही पाणीटंचाईची समस्या जाणवत असून, शेतशिवार कोरडे पडले आहे. मंगरूळ, जानवे भागांतही पाण्याची समस्या असून, या संदर्भात प्रशासनाने पाणीटंचाई जाणविणाऱ्या भागातील ग्रामपंचायतींना उपाययोजना मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 
धुळे जिल्ह्यात तापीकाठावरील गावे वगळता इतरत्र पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. शिंदखेडा, धुळ्याचा पूर्व आणि उत्तर पट्टा या भागातही पाणीटंचाई जाणवू लागल्याची माहिती आहे.
 
न्याहळोद, कापडणे भागात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु यंदा पावसाळा कमी असल्याने कांद्याचे क्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांना ठिबक व इतर पाणी बचत करणाऱ्या यंत्रणांचा वापर करून कांद्याचे उत्पादन घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईचे संकट एप्रिल महिन्यात तीव्र होईल, असे शेतकरी आत्माराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी सांगितले.
 
जेथे जलयुक्त शिवार अभियान राबविले, तेथेही पाणीटंचाई आहे. पाचोरा व जळगाव तालुक्‍यांत असे प्रकार घडले आहेत. मग जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले, की अपयशी याचाही प्रशासनाने विचार करावा, असे कठोरा (जि. जळगाव) येथील सरपंच जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com