वऱ्हाडात पाणीपुरवठ्यासाठी जानेवारीतच टँकरचा आधार

पाणीटंचाई
पाणीटंचाई
अकोला : या हंगामात पाऊस कमी झाल्याने हिवाळ्यातच पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. वऱ्हाडातील प्रकल्पांतील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. जानेवारी महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात सध्या ४१, तर बुलडाणा जिल्ह्यात दोन टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रकल्पांमध्ये साठा कमी होण्याची ही गेल्या पाच वर्षांतील पहिलीच नोंद आहे. 
 
सध्या अकोला जिल्ह्यातील वान या मोठ्या प्रकल्पात ८९ टक्के साठा उपलब्ध आहे. मात्र इतर प्रकल्पांमध्ये फारसे पाणी नाही. अरुणावती प्रकल्पात १३.०७, बेंबळा प्रकल्पात १६.५९, काटेपूर्णा प्रकल्पात १३.८६, नळगंगा प्रकल्पात २९.१४ व पेनटाकळी प्रकल्पात २५.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांमध्ये जानेवारी २०१७ मध्ये एकूण ५७२.२६ दलघमी साठा उपलब्ध होता.  
 
वऱ्हाडातील मध्यम प्रकल्पातही फारसा साठा नाही. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा प्रकल्पात ५८, मोर्णा १४, उमा तीन, अडाण २१, सोनल ०.४१, एकबुर्जी २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ४७, पलढग ७२,मस १४, कोराडी १४, मन १६, तोरणा २२, तर उतावळी प्रकल्पात २९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी जानेवारी महिन्यातच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी पाच ते सहा महिने हा काळ अडचणीचा ठरणार आहे.
वऱ्हाडात यंदा जानेवारीतच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात ४१, तर बुलडाण्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या काळात ही संख्या दर आठवड्याला वाढत जाणार आहे. प्रामुख्याने वऱ्हाडात पाऊस कमी पडल्याने प्रकल्प भरले नव्हते. नदी-नालेही न वाहल्याने पाणीपातळी वाढण्यास काहीही मदत झाली नाही. शिवाय पातळी घटल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे स्रोत आतापासूनच आटले आहेत. पुढील काळात ही परिस्थिती आणखी गंभीर वळण घेऊ शकते. प्रशासनाकडून उपाययोजनांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. 
पडलेला पाऊस सातत्याने जमिनीत मुरला. ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या भागात पाणी अडले. त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला. जोरदार पाऊस झाला असता आणि ‘जलयुक्त’ची कामे तुडुंब झाली असती, तर त्याचा फायदा दिसून आला असता. नेमके हेच झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com