बुलडाण्यातील ७७ गावांना ८० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा : राज्याच्या विविध भागांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला असताना अद्यापही मराठवाडा-विदर्भ सीमेवरील बुलडाणा जिल्हा मात्र जोरदार पावसासाठी अासुसलेला अाहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना लोटला तरीही या जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. जिल्ह्यात अाजही ७७ गावांमध्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  

पावसाला जूनमध्ये प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या अाठवड्यात त्याने जोरदार हजेरी लावली होती. परंतु नंतरच्या काळात पावासाचा मोठा खंड पडला. अाता पुनरागमन होऊनही पावसात फारसा जोर नाही. रिमझिम स्वरूपातील या पावसामुळे बहुतांश नदी-नाले कोरडे अाहेत. विहिरींच्या पातळीत फरक पडलेला नाही. या जिल्ह्यात अातापर्यंत केवळ २७.५९ टक्के पाऊस झालेला अाहे. शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा ५.२८ टक्के एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा अाहे. दररोज ढगाळ वातावरण होते; मात्र पाऊस पडत नसल्याची स्थिती अाहे. प्रकल्प न भरल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यात ७७ गावांना ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात अाहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ९१ प्रकल्पांचा संकल्पित साठा ५३३.५६ दलघमी आहे. परंतु अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या प्रकल्पांत केवळ २८.१९ दलघमी जलसाठा आहे. नळगंगा (मोताळा), पेनटाकळी (मेहकर) व खडकपूर्णा (देऊळगाव राजा) या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.४९ दलघमी म्हणजे ३.८१ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढग (मोताळा), ज्ञानगंगा, मस (खामगाव), कोराडी (मेहकर), मन, तोरणा (खामगाव), उतावळी (मेहकर) या प्रकल्पांमध्ये १४.१० दलघमी म्हणजे १०.३६ टक्के पाणीसाठा आहे.

८१ लघू प्रकल्पांमध्ये ५.६० दलघमी म्हणजे ३.२० टक्के जलसाठा आहे. या वर्षात पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाला टँकरसोबत विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. जिल्ह्यातील ४४२ गावांमध्ये ५२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. या वर्षीची परिस्थिती ही मागील दोन वर्षातील परिस्थितीपेक्षा अधिक गंभीर अाहे. २०१७ मध्ये केवळ ३० टँकरद्वारे २९ गावांना पाणी पुरवावे लागत होते. यावर्षी ही संख्या एेन पावसाळ्यात ८० अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com