जळगावमधील ७४ गावांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

जलयुक्त शिवार अभियानाचा पिण्याचे व शेतीच्या पाण्यासाठी फारसा लाभ झाल्याचे दिसत नाही. कारण, कामे करणाऱ्या यंत्रणा लक्ष देत नाही. कृषी विभाग शेती योजनांचा आहे. पण हा विभाग ‘जलयुक्त’ची सर्वाधिक कामे करू लागला आहे. तांत्रिकदृष्ट्या ते योग्य नसून, यामुळेच कामांचा दर्जाही योग्य राहत नाही. हे अभियान अपयशी ठरणार आहे. - नाना पाटील, शेतकरी, बोदवड.
पाणीटंचाई
पाणीटंचाई
जळगाव  ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावांमध्ये कामे झाली, परंतु तरीही अनेक गावे टंचाईग्रस्त आहेत. काही गावांनाच या अभियानाचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ७४ गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र असून, या गावांमध्ये ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 
 
२०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी २३२ गावांची निवड झाली. त्यासाठी १२१ कोटी ५६ लाख रुपये खर्च केला. ७४०७ कामे त्यातून घेतली.  २०१६-१७ मध्ये २२२ गावांमध्ये हे अभियान राबविले. ९६ कोटी ७८ लाख रुपये निधी खर्च केला. ४७४० कामे पूर्ण केली. १२५ कामे अपूर्ण आहेत.
 
२०१७-१८ मध्ये २०६ गावांची निवड केली. ९१ कोटी ७३ लाख खर्च केला असून, ४२७१ कामे पूर्ण केली. अजून ४०६६ कामे करायची आहेत. हा एवढा निधी खर्च केला, कामे घेतली. तरीही पाणीटंचाई आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत कमी गावांमध्ये टंचाई आहे. २०१७ मध्ये पाऊसमान समाधानकारक नव्हते. त्यामुळे जलसंचय हवा तसा झाला नाही. तरीही जलयुक्त शिवार अभियानामुळे अनेक गावांना लाभ झाला. पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. 
 
ज्या गावांमध्ये दुष्काळी स्थिती असते. टंचाई आहे, अशा गावांची निवड या अभियानातून केली. सर्वच टंचाईग्रस्त गावांमध्ये ‘जलयुक्त’ची कामे झाली नाहीत, परंतु जेथे कामे झाली, त्या गावांमध्येही टंचाई आहे. अमळनेर, पाचोरा, पारोळा भागांत ही समस्या आहे. जेथे ‘जलयुक्त’ची कामे झाली, तेथे टंचाई निर्माण झाल्याने सरकारला पुन्हा या गावांसाठी टॅंकरवर खर्च करावा लागत असल्याची माहिती मिळाली.
 
चाळीसगाव तालुक्‍यात पाणीसाठा वाढला, परंतु पाणीटंचाई अनेक ठिकाणी आहेच. पारोळ्यातही टंचाई असून, या तालुक्‍यातील मुंदाणे, सावखेडे, तरवाडे आदी गावांमध्ये कामांबाबत तक्रारी होत्या. चोपडा तालुक्‍यातही उमर्टी, वराड, सत्रासेन, बोरअजंटी, देवझिरी, वर्डी, अडावद आदी गावांमध्ये कामे घेतली. पण पावसाळा नव्हता. म्हणून या कामांचा उपयोग झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अमळनेर तालुका ‘जलयुक्त’च्या कामांमध्ये अग्रेसर आहे. तरीही या तालुक्‍यात टंचाई असून, गलवाडे खुर्द, लोणपंचम, चौबारी, भोरटेक, आर्डी, चिमणपुरी, मंगरूळ, ढेकूसीम, धार, मालपूर, अंतुर्ली, रंजाणे, सबगव्हाण, धानोरा, खापरखेडा, शिरसाळे बुद्रूक, शिरसाळे खुर्द आदी गावांमध्ये पहिल्या टप्प्यात कामे झाली होती. या गावांमध्ये शेतशिवाराला कामांचा लाभ झालेला नसल्याची माहिती मिळाली.
 
यंदाही अमळनेर तालुक्‍यात देवगाव देवळी अंचलवाडी, पळासदळे, वासरे, नगाव, गडखांब, रामेश्‍वर, जवखेडा, कोंढावळ, वावडे, पाडसे, लोणसीम, बहादरवाडी, शहापूर, पिंपळी पिळोदे, कुऱ्हे बुद्रुक आदी गावांमध्ये कामे घेतली जाणार आहेत.  
 
जिल्ह्यात ७४ टॅंकर सुरू असून, ज्या अमळनेर तालुक्‍यात सर्वाधिक कामे जलयुक्त शिवार अभियानातून घेतली, त्याच तालुक्‍यात सर्वाधिक ३९ गावे टंचाईग्रस्त असून, १४ टॅंकर सुरू आहेत. जामनेरात १८ गावे टंचाईग्रस्त असून, १३ टॅंकर सुरू आहेत. बोदवड, भुसावळ व पाचोरा येथे प्रत्येकी एक गाव टंचाईग्रस्त आहे. तर पारोळा तालुक्‍यात १४ गावे टंचाईग्रस्त असून, सहा टॅंकर सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com