सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली

पाणीटंचाई
पाणीटंचाई

सातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत टॅंकरच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांतील ४० गावे ११९ वाड्यावस्त्यांवरील ५१ हजार ६२७ लोकसंख्येस ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होऊ लागल्याने पाणीटंचाईदेखील वाढली आहे. गतसप्ताहात टॅंकरची संख्या २९ होती ती आता ३५ वर गेली आहे. माण तालुक्‍याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक १० टॅंकरद्वारे १४ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांवरील १६ हजार ८०६ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे.

जावली तालुक्‍यातील तीन गावे व सहा वाड्यावस्त्यांना ७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यातील सात गावे २७ वाड्यावस्त्यांना ५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील सहा गावांना पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्‍यात एका गावाला एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्‍यातील दोन गावे, एका वाडीवस्तीला दोन टॅंकरद्वारे, पाटण तालुक्‍यातील दोन वाड्यावस्त्यांना दोन टॅंकरद्वारे तर महाबळेश्वर तालुक्‍यातील सात गावे व तीन वाड्यावस्त्यांना तीन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील २१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ४, खटावमधील १, कोरेगावमधील २,फलटणमधील १, वाईमधील १, जावलीमधील ५, महाबळेश्वरमधील ७ विहिरींचा समावेश आहे.  खटाव तालुक्‍यातील माळीनगरला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणीपुरवठा करणारा टॅंकर आधी मळी वाहतुकीला वापरला जात होता. त्याद्वारे आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणी मळीयुक्त व पिवळे आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. त्यामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याच्या लोकांच्या तक्रारी येत आहेत.

त्याची दखल घेत रणजित माने, माजी उपसरपंच दादासाहेब कचरे, महेश जाधव, गजानन माळी, शहाजी माळी, अविनाश दगडे आदींनी माळीनगरला भेट दिली. टॅंकरने वितरित केलेले पाणी पाहिले. तेव्हा पिवळे व दुर्गंधीयुक्त असल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले. त्या वेळी त्यांनी तेथील पाण्याचे नमुने घेऊन थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपाल चव्हाण यांनी हे पाणी दूषित असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com