खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी

खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी

जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून गिरणा, वाघूर या प्रकल्पांमधील साठा ४० टक्‍क्‍यांखाली आला आहे. तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातील साठाही ६५ टक्‍क्‍यांपर्यंत असून, हा प्रकल्प मार्चपर्यंत ७० टक्के रिकामा होईल, असे सांगितले जात आहे. 

प्रकल्प झपाट्याने रिकामे होतील म्हणून प्रशासनाने हतनूरमधून रब्बीसाठी दुसरे आवर्तन देण्यास नकार दिला आहे. गिरणा नदीतूनही एकदाच पिण्याच्या पाण्यासंबंधी आवर्तन सोडण्यात आले. आता शेतकरी, ग्रामस्थांकडून आवर्तनाची मागणी केली जात आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगितले जात आहे. गिरणा धरणात ३८, तर वाघूरमध्ये सुमारे ३९ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. वाघूर प्रकल्पातून जामनेर, जळगाव या शहरांसह उद्योगांसाठी पाणी दिले जाते. मध्यम प्रकल्पांमध्ये रावेरातील अभोरा, मंगरूळ व सुकी हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. या तिन्ही प्रकल्पांमधील साठा ७५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील हिवरा व अग्नावतीमधील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. हिवरामध्ये १२, तर अग्नावतीमध्ये ५० टक्‍क्‍यांपर्यंत साठा आहे. बहुळा, मन्याड, बोरी, भोकरबारी व अंजनी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. ते पावसाळ्यात भरलेच नव्हते. 

धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्पही १०० टक्के भरला होता. परंतु त्यातही ७० टक्‍क्‍यांपर्यंत साठा आहे. या प्रकल्पातून रब्बीसाठी एक आवर्तन सोडण्यात आले. दुसऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. करवंद प्रकल्पातही साठा ६० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. बुराई प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा होता. धुळे जिल्ह्यातील तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा होता. तो ८० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दरा प्रकल्पात ५०, तापी नदीवरील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधील जलसाठा ७० टक्‍क्‍यांपर्यंत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com