कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. नद्यांबरोबर अनेक तलावांत जेमतेम काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात असणाऱ्या ४४७ तलावांपैकी २२२ तलाव कोरडे पडले आहेत. ज्या १९३ तलावांमध्ये पाणी आहे, त्यामध्येदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या तलावांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. राहिलेल्या तलावांमध्ये १५ ते २० टक्केच पाणीसाठा आहे. चंदगड तालुक्यातील सर्वाधिक ६० तलाव कोरडे आहेत. या तालुक्यात ८५ तलाव आहेत. याशिवाय आजरा तालुक्यातील २५, भुदरगडमधील ११, गगनबावडामधील ६, गडहिंग्लजमधील ३५, हातकणंंगलेमधील २२, कागलमधील २६, करवीरमधील १५, पन्हाळ्यातील ३३, राधानगरीमधील ८, शाहूवाडीमधील ९ व शिरोळ तालुक्यातील १४ तलावांमध्ये पाणी नाही.

अनेक विहिरींमधील पाणीपातळी खाली गेली आहे. टंचाईग्रस्त गावात पर्यायी पाणीपुरवठ्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विहिरीत पारा मारणे, विहीर फोडणे, गाळ काढणे, कूपनलिका खोदणे आदी प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहेत. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती नसतानाही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने या कामांसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

एका बाजूला कडक ऊन आणि दुसरीकडे एकही वळीव पाऊस नसल्याने तहानलेल्या पिकांसाठी अधिक उपसा झाल्याने अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊस सुरू होईपर्यंत शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान ठरत आहे.  नियोजनात बदल केला असला तरी गतवेळीइतकाच साठा यंदाही शिल्लक आहे. उलट, यंदा उसाचे वाढलेले क्षेत्र, वळीव नाही, त्यातच कडक उन्हाचा मारा, वाढलेले बाष्पीभवन यामुळे पाणी अधिक लागले. गतवर्षीपेक्षा यंदा उपसा कालावधीही जास्त होता, म्हणून पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शेतीला पाण्याचा ताण सहन करावा लागत असल्याने याचा परिणाम उसावर होत आहे. वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने ऊस शेती तहानलेली राहत आहे. वळीव पाऊस नसल्याने पिकांना पाण्याची जादा गरज लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com