दहा हजार गावांत खोल खोल पाणी..!

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली. विदर्भात पावसाने सरासरीही गाठली नाही, त्यामुळे विदर्भात भूजलपातळी वाढली नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. येत्या उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात अधिक पाणीटंचाई जाणवेल. त्यासाठी विदर्भातील नागरिकांनी आत्तापासून पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. - शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
दहा हजार गावांत खोल खोल पाणी..!
दहा हजार गावांत खोल खोल पाणी..!

पुणे ः यंदाच्या पावसाळ्यातील चार महिने पश्चिम महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पाऊस पडला. परंतु, या काळात विदर्भात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे यंदा विदर्भात भूजलपातळी अधिक खालावली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणातून येत्या उन्हाळ्यात राज्यातील दहा हजार १६७ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात विदर्भातील ६ हजार ८०६ गावांमध्ये मोठी पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सरकारला आगामी काळातील विदर्भातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहे.  

राज्यातील ३,९२० विहिरींच्या नोंदी   जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे भूजलपातळी किती वाढली याचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणा करते. यंदाही राज्यातील स्थिर भूजलपातळीच्या पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या तीन हजार ९२० निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. त्या निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्यातील सरासरी भूजलपातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २३० तालुक्यांमधून दहा हजार १६७ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. तर दहा हजार ९९५ गावांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त, दोन हजार ५८७ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, पाच हजार ५८५ गावांमध्ये एक ते दोन मीटर एवढी घट आढळून आली असल्याचे दिसून आले. 

कमी-अधिक पावसाचा परिणाम  यंदा राज्यातील जून ते सप्टेंबर महिन्यांतील पडलेल्या पावसाचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये एकूण ३५३ तालुक्यांपैकी ९७ तालुक्यांत ०-२० टक्के घट आढळून आली. तर ४५ तालुक्यांत २०-३० टक्के, ८० तालुक्यांत ३० ते ५० टक्के घट आढळून आली. एकोणीस तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आढळून आली असून, ११२ तालुक्यांत सरासरी आणि त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नमूद करण्यात आले. परंतु भूजलपातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावांत पाणीटंचाईची शक्यता कमी असून, ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावात पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसते. मात्र, पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत सरासरीहून अधिक पाऊस पडला. विदर्भात पावसाने सरासरीही गाठली नसल्याचे आढळून येते.  गेल्या वर्षी वाढली होती पाणीपातळी  गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा भूजलपातळीचा तुलनात्मक केलेल्या अभ्यासामध्ये राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी १०० तालुक्यांत १३८१ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली होती. तर १६० गावांत तीन मीटरपेक्षा जास्त, ३०८ गावांत दोन ते तीन मीटर, ९१३ गावांत एक ते दोन मीटर एवढी घट आढळून आली होती. त्यामुळे एकंदरीत या अभ्यासाचा निष्कर्ष काढल्यास गेल्या वर्षी राज्यातील बहुतांशी भागांत सर्वत्र एकसारखा पाऊस पडल्याचे दिसून येते.   सरकारला उचलावी लागणार ठोस पावले  मागील पाच ते सहा वर्षांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले होते. त्या वेळी भूजलपातळी वाढविण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना आणून राज्यातील ओढे, नाले खोलीकरण व रुंदीकरण केले, गाळ उपसला, त्यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. यंदाही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बहुतांशी धरणे भरली. जलयुक्तच्या कामामुळे भूजलपातळी वाढली असली, तरी कोकणात ठाणे विभागातील ५९ गावांमध्ये एक मीटरपेक्षा खोल पाणीपातळी गेली आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक विभागातील १३९३ गावे, पुणे विभागातील २९४ गावे, मराठवाड्यातील १६१५ गावांमध्ये एक मीटर पाणीपातळी खोल गेली आहे. विदर्भात कमी झालेल्या पावसामुळे पाणीपातळी वाढली नसल्याचे दिसून आले आहे.     भूजलपातळी घटण्याची कारणे 

  • कमी पर्जन्यमान, पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण 
  • पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी 
  • बारमाही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी भूजलाचा अतिवापर 
  • पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती  
  • भूजल व्यवस्थापनाचा अभाव
  • पाणीटंचाई कालावधीसाठी खालील गृहीतके धरली जातात 

    क्षेत्र पर्जन्यमानातील तूट (टक्के) स्थिर पाणी पातळीतील तूट  संभाव्य टंचाईचा कालावधी 

    अवर्षणप्रवण व शाश्वत पर्जन्यमान

    २० टक्क्यांपेक्षा जास्त तीन मीटरपेक्षा जास्त  आॅक्टोबरपासून पुढे 
        दोन ते तीन मीटर  जानेवारीपासून पुढे
         एक ते दोन मीटर   एप्रिलपासून पुढे
         शून्य ते एक मीटर   मॅनेजेबल टंचाई
    अति पर्जन्यमान    २० टक्क्यांपेक्षा जास्त   दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे 
        एक ते दोन मीटर एप्रिलपासून पुढे

                                विभागनिहाय भूजलपातळीत तूट असलेल्या गावांची संख्या  

    विभाग   तीन मीटरहून अधिक   दोन ते तीन मीटर  एक ते दोन मीटर एक मीटरपेक्षा जास्त  
    ठाणे    ५   ९      ४५    ५९ 
    नाशिक   १९७     ३७४    ८२२    १३९३ 
    पुणे     १३     ६३      २१८   २९४ 
    औंरगाबाद  ४४४   ३८१       ७९०   १६१५ 
    अमरावती    ८५२   ११६५    २०२३  ४०४० 
    नागपूर    ४८४    ५९५    १६८७   २७६६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com