नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकट

नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकट
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकट
नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले आहे. आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.
अशाच प्रकारे २१०२ मध्ये अशाच स्थितीमुळे जिल्ह्यावर कोसळलेल्या संकटाची पुनरावृत्ती होईल का? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जून महिन्यातील पर्जन्यमानाचा विचार करता, फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. तरीही जमिनीची धूप कमी होण्यास त्यामुळे मदत झाल्याने जुलै महिन्यात दमदार पावसाच्या भरवश्यावर जवळपास ८२ टक्के पेरणी पूर्ण करण्यात आली. उर्वरित पेरणी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली. परंतु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या पिकाला आता पावसाची गरज आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांतील मका, बाजरी पिकाचे दाणे भरण्याची अवस्था आणखी दहा ते बारा दिवसांत सुरू होणार असून, याच काळात कपाशींचे बोंड फुटणार आहे. पिकाचे उत्पन्न वाढीसाठी या काळात पिकांना पाणी हवे आहे. त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांत भाताची आवणी पूर्ण होऊन त्यांनाही आता फुटवे फुटू लागले आहेत. सध्या तरी या भागात अधून-मधून पावसाची हजेरी कायम असल्याने त्यांना फारशी चिंता नाही. जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी उशिराने पेरणी करण्यात आल्याने या ठिकाणी पाऊस पडूनही उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
दुसरा हंगाम वाया जाण्याची भीती पावसाअभावी चालू हंगामावर परिणाम होण्याबरोबरच आॅक्टोबरअखेर लागवड केल्या जाणाऱ्या कांदा पीकदेखील घेता येईल की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी पावसाळ्यात दोन पिकांचे हंगाम घेत असतो. जून, जुलैमध्ये मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन यांसारखे पिके घेतो. आॅक्टोबरनंतर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा पहिल्या हंगामातील पीक पेरणीच धोक्यात आल्याने दुसरा हंगाम कोरडा जाण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करीत आहेत.
आठ तालुके तहानलेले गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास २० टक्के पाऊस कमी झाला असून, जिल्ह्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सरासरी ६० टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. पश्चिम पट्ट्यातील तालुके वगळता दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, निफाड या आठ तालुक्यांत अद्यापही ५० टक्के पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांची अवस्था तर बिकट झालीच आहे, परंतु पिण्यासाठीदेखील पाणी नसल्याने या तालुक्यांना आॅगस्ट महिन्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com