जलयुक्तमुळे साडेसात हजार 'टीसीएम' पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : जलयुक्त शिवार योजनेतून दोन वर्षांत केलेल्या कामाचे फलित आता दिसू लागले आहेत. योजनेत लोकांचाही महत्त्वपूर्ण सहभाग दिसत आहे. नगर जिल्ह्यामध्ये दोन वर्षांत १६८९ तलावांतील गाळ काढला आहे. हा गाळ टाकल्यामुळे बावीस हजार ७३१ शेतकऱ्यांच्या तब्बल ८ हजार ६३७ हेक्‍टर क्षेत्रावरील जमिनीला सुपीकता आली, तर गाळ काढलेल्या तलावांत ७ हजार ५४२ ‘टीसीएम’ पाणीसाठा झाला आहे. जलयुक्त योजनेतून राज्यात सर्वाधिक तलावातील गाळ नगर जिल्ह्यामध्ये काढला आहे.

टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा ताळमेळ घालत सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सिंचन क्षेत्र वाढीसाठी खास प्रयत्न केले जात आहेत. नगर जिल्ह्यामध्ये जुन्या काळी झालेल्या तलाव-बंधारे, गाव तलाव, पाझर तलावांसह मध्य आणि लघू प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. रोजगार हमी व अन्य योजनांतून गाळ काढण्याची लोकांकडून मागणी केली जात होती. मात्र त्यासाठी फारसा निधी उपलब्ध होत नव्हता.

जलयुक्त शिवार योजना सुरू झाल्यापासून गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जलयुक्तमधून नव्याने कामे करण्याबरोबरच जुन्या कामांच्या दुरुस्तीलाही प्रधान्य दिले जात आहे. "तलावातील गाळ काढून शेतात टाकला तर शेती सुपीक होते आणि तलावात पाणीसाठा वाढतो'' याबाबत जागृती करत लोकांची मदत घेतल्याने गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

दोन वर्षांत लोकसहभाग, महात्मा फुले जलभूमी अभियान आणि जलयुक्त यातून तब्बल १६९८ तलावांतून तब्बल ८८ लाख ३४ हजार ४१० घनमीटर गाळ काढला आहे. या सर्व कामाची किंमत २२ कोटी रुपये आहे. तलावातील गाळ काढण्याचे आणि लोकसहभागातून राज्यात सर्वाधिक काम नगर जिल्ह्यात झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

लोकसहभागातून साडेसतरा कोटींचे काम जलयुक्त शिवार अभियानात लोकहभागाला प्राधान्य दिले जात आहे. "आपल्या विकासासाठी आपणच काम करायचे''असे समजून लोकसहभाग वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदाही चांगला झाला आहे. जलयुक्तमधून दोन वर्षांत तब्बल ६५५ तलावांतील गाळ काढला आहे. त्याची सरकारी दराने सतरा कोटी ५६ लाख ९३ हजार रुपये किंमत होते. त्या तलावात यंदा जवळपास पाच हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे. लोकसहभागातून काढलेला ६० लाख ५८ हजार २७४ घनमीटर गाळ पंधरा हजार शेतकऱ्यांनी शेतात टाकल्यामुळे पाच हजार चारशे हेक्‍टर क्षेत्राला सुपीकता आली आहे.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानातून जोरात कामे सुरू आहेत. नगर जिल्ह्यामध्ये तर जलयुक्त शिवार म्हणजे लोकचळवळ झाली आहे. दोन वर्षांत झालेल्या कामांमुळे यंदा जिल्ह्यामध्ये अनेक गावे पाणीदार झाली आहेत. सरकारने योजनेतून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याचे ध्येय ठेवले आहे. प्रा. राम शिंदे, जलसंधारणमंत्री व पालकमंत्री, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com