धरणातील पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : यंदा पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली. गेल्या दोन महिन्यांत वाढत असलेल्या पाण्याच्या वापरामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत आतापर्यंत १४७.६३ टीएमसी पाणी उपलब्ध असून, पुणे शहरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात पावसाची सरासरी ६१२.७ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी ९८८.७ मिलिमीटर म्हणजेच १६१.४ टक्के एवढा पाऊस झाला. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन महिने कमी पाऊस झाला असला, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे भरून वाहिले.

तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के तुडुंब भरले होते. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी भासणारी पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात सुटणार असल्याचे चित्र होते. परंतु गेल्या दोन महिन्यांतील पाण्याचा वापर पाहता अशीच स्थिती पुढील काळात राहिल्यास उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, पवना या धरणांतून पाणीपुरवठा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी वीर धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्याला आवर्तन सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

टेमघर धरणात अवघा नऊ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या विसापूर, कळमोडी, चासकमान आणि पानशेत ही धरणे शंभर टक्के भरलेली असली, तरी उर्वरित धरणांतील पाणीसाठा ९० ते ९५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान झाला आहे. येत्या रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यात या पाण्याचा वापर आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्‍यकता आहे. तरच उन्हाळ्यात पाणीप्रश्न काहीसा सुटेल, अन्यथा पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com