जत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

जत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा
जत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

सांगली : बेबंद पाणीउपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा, वाढते तापमान आणि कमी पाऊसमान, यामुळे जत तालुक्‍याला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जवळपास ५० गावे टंचाइने त्रस्त झाली आहेत. सहा गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिकेतून पाणीपुरवठा सुरू आहे. याबरोबरच १६ गावांकडून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे.

तलावातील पाणीसाठा घटला आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. पिके होरपळू लागली आहेत. जनावरांचे हाल सुरू आहेत. अशावेळी म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी सतत सोडणे आवश्‍यक असताना शासन व प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

जत तालुक्‍यात उन्हाळा कडक जाणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी वरुणराजाची कृपा झाल्याने यंदा दुष्काळाच्या झळा फार जाणवल्या नाहीत. यंदा सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाचा पत्ता नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे टॅंकर देण्याचे अधिकार आहेत. स्थानिक पातळीवर मंडळ अधिकारी व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. टॅंकरसाठी भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. टॅंकरग्रस्त गावांमधील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. तलाव कोरडे पडू लागले आहेत, पाणी योजनांचे स्राेत आटले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

मागील वर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामधून कुंभारी, कोसारी, बागेवाडी, गुळवंची, कंठी, बिरनाळ, शेगाव, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील तलाव भरून घेण्यात आले होते. तो पाणीसाठा आता संपुष्टात आला आहे. कृष्णा नदीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी फळबागा व नगदी पिके घेतली आहेत. यावर्षी पाणी सोडण्याची चिन्हे दिसत नसल्याने पश्‍चिम भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टंचाईग्रस्त गावे  : उमदी, डफळापूर, बिळूर, तिकोंडी, मुचंडी, माडग्याळ, गुड्डापूर, उमराणी, जिरग्याळ, मिरवाड, शिंगणापूर, कुडनूर, लकडेवाडी, अमृतवाडी, सनमडी, मायथळ, टोणेवाडी, वज्रवाड, बसर्गी, खिलारवाडी, येळदरी, गूगवाड, सिंदूर, एकुंडी, वळसंग, बागलवाडी, बेळुंखी, बाज. टॅंकर मागणी केलेली गावे : कोतेबोबलाद, अंकलगी,व्हसपेठ, सोन्याळ, हळ्ळी, अचकनहळ्ळी, कोनबगी, काराजनगी, सोनलगी, अंतराळ, माडग्याळ, आंसगी-जत, तिल्याळ, पांढरेवाडी, लमाणतांडा (द), दरिबडची.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com