वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा ठप्प

बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग बंद आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून, बंधाऱ्याच्या तळाचे काम झाले, की धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्‍यता आहे. - व्ही. जे. डवरी, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
बंधाऱ्याचे काम सुरु
बंधाऱ्याचे काम सुरु

कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. वारणा नदीचे पात्र कोरडे पडल्याने वारणा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या व शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून नदीतून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

नदीवरील चावरे-घुणकी दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची, दानोळीजवळील बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे पाणी ठिकठिकाणी अडविण्यात आले आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्याचे पिलर पावसाळ्यात ढासळले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दुरुस्तीकाम सुरू केले आहे. अडथळ्यामुळे मांगलेदरम्यान बंधाऱ्यातील पाणी अडविल्याने येथील उपसा योजनेजवळच पात्र कोरडे पडले आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता, अद्याप चार ते पाच दिवस दुरुस्ती चालणार असल्याचे सांगण्यात आले. या गावातील ग्रामपंचायतींनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. पाणीपुरवठा अचानक ठप्प झाल्याने कूपनलिका, विहिरींवर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. पाणीपातळी कमी झाल्याने अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे इंटक उघडे पडले आहेत.

नदीत बांध घालून, पाणी आडवून इंटकवेलपर्यंत पाणी साठविण्याचा प्रयत्न करून पाण्याची उपलब्धता केली जात आहे. अनेक गावांत पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच शेतीच्या पाणी योजनाचे उपसा पंप बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी उपसा पंपाच्या फुटबॉलची लांबी वाढवून, चर मारून पाणीउपसा करीत आहेत.

नदीतील पाणी कमी झाले आहे. बांध घालून, पाणी आडवून पाणीपुरवठा केला आहे. पातळी अशीच राहिली, तर पुरवठा करणे कठीण आहे. इंटकवेलमधील गाळ काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे दानोळीच्या सरपंच सुजाता शिंदे यांनी सांगितले.

नदीत पाणी नसल्याने उपसा पंपातून पाणी उपसणे अशक्‍य झाले आहे. ‘ऑक्‍टोबर हीट’ असल्याने पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. लवकर नदीत पाणी न आल्यास पिके वाळण्याची शक्‍यता आहे. असे शेतकरी स्वप्नील पाराज यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com