मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४ टक्क्‍यांवर

मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४ टक्क्‍यांवर
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४ टक्क्‍यांवर

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एकीकडे टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भूपृष्ठावरील पाणीसाठ्यांमधील पाणीही झपाट्याने घटत आहे. मराठवाड्यातील ८७२ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा केवळ ४.३१ टक्‍क्‍यांवर आला आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागाची तहान व सिंचनाची गरज भागविण्याची क्षमता असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठाही मृतसाठ्यावर आला आहे. 

पावसाच्या खंडामुळे यंदा मराठवाड्यावर भीषण जलसंकटाचे ढग जमा झाले आहेत. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३. ९५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्‍त पाण्याचा थेंबही या प्रकल्पात शिल्लक नाही. यापाठोपाठच येलदरी, निम्न तेरणा व निम्न दुधना प्रकल्पातही उपयुक्‍त पाण्याचा थेंब शिल्लक नाही. सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, सीनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा उणेमध्ये गेला आहे.  

७५ मध्यम प्रकल्पांपैकी ५१ प्रकल्पांत पाण्याचा थेंब शिल्लक नाही. त्यामध्ये औरंगाबादमधील १४, जालन्यातील ५, बीडमधील १३, लातूरमधील ४, उस्मानाबादमधील ११, नांदेडमधील ३, तर परभणीमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. उर्वरीत २४ मध्यम प्रकल्पांत केवळ ४.५५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील २, तर परभणी जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पांत प्रत्येकी केवळ २ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरील नदीवरील ११ बंधाऱ्यात केवळ ९.०७ टक्‍के, तर तेरणा मांजरा रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ७४९ लघुप्रकल्पात केवळ ५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघुप्रकल्पांत ६ टक्‍के, जालनामधील ५७ प्रकल्पांत १ टक्‍का, बीडमधील १२६ प्रकल्पांत २ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ लघुप्रकल्पांत ५ टक्‍के, नांदेडमधील ८८ लघुप्रकल्पांत १३ टक्‍के, परभणी जिल्ह्यातील २२ लघुप्रकल्पांत ७ टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघुप्रकल्पांत केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com