धनोली धरणाचे गेट तोडल्याने पाण्याचा अपव्यय

सदर घटनेने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची नुकसानभरपाई द्यावी, तसेच हा कालवा मागील पंधरा वर्षांपासून नादुरुस्त होता. याची तक्रार वेळोवेळी केली असून. पाटबंधारे विभागाने याची दखल घेतली नाही. - हरिश्चंद्र पाडवी, उपसरपंच, धनोली
धनोेली धरणाचे गेट तोडल्याने पाणी वाहून शेतीचे नुकसान झाले
धनोेली धरणाचे गेट तोडल्याने पाणी वाहून शेतीचे नुकसान झाले

नाशिक   : कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडून पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धरणातील उपलब्ध १५ दशलक्षघनफूट पाण्यापैकी अंदाजे सात ते आठ दशलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असताना ऐन उन्हाळ्यात दळवट येथील चार इसमांनी धरणाचे गेट तोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अज्ञात इसमांनी शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडले. यानंतर धरणातून पाण्याचा मोठा प्रवाह सुटल्याने धरणाच्या बाजूस पाणी वाहून आले. शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. या वेळी हा घडलेला प्रकार पाहत असताना शेतकऱ्यांना गेटच्या बाजूने चार जण पळताना दिसले. शेतकऱ्यांनी धावत जाऊन त्यांचा पाठलाग केला व त्या चारही इसमांना पकडण्यात त्यांना यश आले. या घटनेनंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत या इसमांना ताब्यात घेतले व धनोली गावातील मंदिरात त्यांना कोंडून ठेवले. सदर इसमांची चौकशी केली असता ते तालुक्यातील दळवट येथील रहिवासी असल्याचे समजले. ही घटना समजताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्यासह अभोणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर येथील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (वय ६०), सोनू बंडू गावित ( वय ६०), शंकर केवजी चव्हाण (वय ५५), सुभाष येवाजी पवार (वय ६०) यांना अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीमालाचे मोठे नुकसान

धरणातून वाहत आलेल्या पाण्यामुळे आदिवासी शेतकरी  अंबादास गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, सुखराम पवार, किसन  वाघ, भास्कर दळवी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पाण्याच्या जलद प्रवाहामुळे सुमारे तीनशे क्विंटल कांदा वाहून गेला तसेच शेतात साठविलेला जवळपास दीडशे क्विंटल कांदा भिजला आहे. शेतात उभ्या असलेल्या मिरची, कोथिंबीर, उन्हाळी बाजरी व वालपापडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.   सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून, सद्यःस्थितीत धरणात १५ दशलक्षघनफूट पाणीसाठा होता. परंतु, गेट तोडल्याने जवळपास सात ते आठ दशलक्षघनफूट पाणी वाया गेले आहे. गेट तोडणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता  अभिजित रौंदळ यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com