जळगावमधील करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : एकेकाळी तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात आजघडीला गळीत धान्य किंवा तेलबियांचे क्षेत्र नामशेष झाल्याची स्थिती आहे. मजूरटंचाई, उत्पादनात झालेली मोठी घसरण व पाण्याची समस्या आदी संकटांमुळे करडईसह भुईमुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात भुईमुगाचे क्षेत्र २००० पर्यंत १७ ते १८ हजार हेक्‍टर असायचे. तर करडई हे दादरसारखे प्रमुख कोरडवाहू पीक होते. करडईचे क्षेत्र सुमारे १२ ते १३ हजार हेक्‍टर असायचे; परंतु १९९५ पासून करडईवर सातत्याने मावा व करपा रोग आला. त्यात उत्पादकता एवढी घटली की बियाणे व मजुरीचा खर्च निघणेही अशक्‍य झाले. करडईच्या पिकावर शेतकरी घरातील मोठे कार्य पार पाडायचे, एवढी वित्तीय मदत या पिकामुळे व्हायची.

यावल, जळगाव, चोपडा भागांतील काळी कसदार जमीन करडईसाठी उपयुक्त अशी आहे. आजघडीला फक्त आसोदे, नशिराबाद, यावल भागांत कुठेतरी करडईचे क्षेत्र नजरेस पडते. उत्पादकता एकरी ९ क्विंटलपर्यंत होती. ती १९९८ मध्ये एकरी दीड क्विंटलपर्यंत खाली आली होती. मावा व करपा या रोगांवरचे उपायही न परवडणारे झाले. त्यामुळे हळूहळू पेरणी कमी होत गेली व सद्यःस्थितीत फक्त ८० एकरवर करडई आहे. शिवाय करडईला काटे असल्याने मजूरही कापणी व मळणीला नाक मुरडायचे.

भुईमुगाचे क्षेत्रही १८ ते १९ हजार हेक्‍टवरवरून अडीच हजार हेक्‍टरवर आले आहे. चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा भागांत भुईमूग अधिक असायचा. या भागातील जमीन भुईमुगाला मानवते; परंतु चोपडा व यावलमधील सातपुडा पर्वतालगत पाण्याचे स्रोत कमी झाले. मुक्ताईनगर व रावेरात भुईमुगाची जागा केळीने घेतली. भुईमूग काढणी किंवा पिळण्यासाठीही मजूर फारसे मिळत नाहीत, अशी माहिती मिळाली.

नशिराबाद, आसोदा, भादली, विदगाव भागातील ६० टक्के क्षेत्र करडईखाली व्यापायचे. परंतु सध्या करडई पीक नामशेष झाले आहे. मावा व करपा रोग निर्मूलन न झाल्याने हे पीक जिल्ह्यातून जणू हद्दपार झाले.

- किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा.

करडईचे तेल घेणाऱ्यांची संख्या जशी कमी झाली, तसे तिचे दरही पडले. करडई जिल्ह्यात अधिक होती, म्हणून स्वतंत्र राष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्रही जळगावला होते. १९८८ मध्ये हे केंद्र सोलापूरला हलविले. नंतर क्षेत्र कमी होत गेले. करडईचे पीक नामशेष होण्यामागे फक्त कमी दर हे प्रमुख कारण आहे.

- डॉ. सुदाम पाटील, प्रमुख, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com