कमी दाब क्षेत्र विरले; थंडीत वाढ

कमी दाब क्षेत्र विरले; थंडीत वाढ
कमी दाब क्षेत्र विरले; थंडीत वाढ

पुणे : गेल्या आठवड्यात अरबी समुद्राजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने थंडीत पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. मंगळवारी (ता. 9) सकाळी आठ वाजेपर्यत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 8.8 अंशाची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या शनिवार (ता.13) पर्यत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

उत्तरेकडील काही राज्यात थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत आहे. कोकणातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यत घट झाली आहे. भिरामध्ये 15.0 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, नाशिक येथील किमान तापमान दहा अंशाच्या जवळपास होते. कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते.

मराठवाड्यातील किमान तापमानात गेल्या आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात 11.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. परभणी शहरात किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस होते. औंरंगाबाद, नांदेड येथील तापमानही दहा अंशांच्या वर होते. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यत घट झाली आहे. गोंदियामध्ये 9.0 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस होते. अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते.

मंगळवारी (ता.9) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 16.6 (-2), अलिबाग 17.8 (1), रत्नागिरी 16.6 (-3), भिरा 15.0 (1), डहाणू 16.9, नगर 10 (-1), पुणे 11.0, जळगाव 10.0 (-2), कोल्हापूर 15.5 (1), महाबळेश्वर 13.0, मालेगाव 12.0 (1), नाशिक 10.3, निफाड 8.8, सांगली 14.6 (2), सातारा 11.8 (-1), सोलापूर 15.4, औरंगाबाद 13.0 (-2),परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 11.5, परभणी शहर 12.1 (-2), नांदेड 14.5 (1), अकोला 13.8, अमरावती 13.6 (-1), बुलढाणा 14.2, चंद्रपूर 10.6 (-3), गोंदिया 9.0 (-4), नागपूर 9.6 (-3), वर्धा 11.9 (-1), यवतमाळ 12.4 (-3)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com