विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत वादळी पाऊस

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत वादळी पाऊस
विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत वादळी पाऊस

पुणे : राज्यात उन्हाची काहिली वाढली असतानाच रविवारी (दि. ११) मराठवाडा, विदर्भातील सुमारे ९ ते १० जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील भिरा येथे उच्चांकी ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर गुरुवारपासून (दि.१५) राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अचानक आलेल्या पावसाने फळबागांसह रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेतील पिकांचे नुकसानही केले. शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या परिसरात विजा, मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. नगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात पावसाने शिडकावा केला. तर रविवारी दुपारनंतर विदर्भात ढग दाटून येत अंधारून आले. अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ, रिधोरा, व्याळा परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव (ता. सेलू), जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई, औरंगाबादच्या चापानेर (ता. कन्नड), परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाने शिडकावा केला. बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र, लक्षद्वीप बेटांपासून कोकण किनाऱ्यापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा, उत्तर मध्य महाराष्टात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. पुढील आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असून, गुरुवारपासून (दि.१५) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारी (दि. ११) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.६, जळगाव ३७.६, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३२.३, मालेगाव ३७.०, नाशिक ३६.२, सांगली ३७.१, सातारा ३७.२ सोलापूर ३८.६, अलिबाग ३०.७, रत्नागिरी ३३.६, डहाणू २९.७, भिरा ४०.७, औरंगाबाद ३५.७, परभणी ३७.८, नांदेड ३८.०, उस्मानाबाद ३३.६, अकोला ३७.६, अमरावती ३६.२, बुलडाणा ३६.४, ब्रह्मपुरी ३७.०, गोंदिया ३५.८, नागपूर ३६.९, वर्धा ३७.५, यवतमाळ ३६.०.

कमी दाबाचे क्षेत्र होतंय तीव्र बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार होत असलेल्या कमी दाबाची तीव्रता वाढत अाहे. वायव्येकडे अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असलेल्या हे क्षेत्र मंगळवारपर्यंत ठळक होणार असून, बुधवारपर्यंत तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर होईल. मंगळवार आणि बुधवारी श्रीलंका आणि तमिळनाडूच्या दरम्यान असलेल्या कोमोरीन भागात, तसेच तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com