संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात बाॅयलर तेजीत

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन
आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ झालीय. चालू आठवड्यात विजयादशमीमुळे बाजारात पुरवठा वाढेल, पण मागणीही चांगली राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
नाशिक विभागात शनिवारी ( ता. २३)  ८० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. श्रावणानंतर बाजाराने प्रथमच ८० चा टप्पा गाठला आहे. श्रावण ते नवरात्रीच्या कालावधीत अलीकडील वर्षांच्या सरासरी भावाच्या तुलनेत यंदा बाजार जास्त तुटला नाही. बाजार खाली येताच वेगाने सुधारणा झाली आहे.
 
बाजाराच्या पुढील वाटचालीसंदर्भात महाराष्ट्र पोल्ट्री ब्रिडर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत नवरात्रीत सातत्याने मंदीत राहणारा बाजार यंदा तेजीत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी प्लेसमेंट करताना सावध पावले उचलली. याशिवाय, पक्ष्यांच्या विक्रीत शिस्तबद्ध सातत्य ठेवले आहे. तेजीबाबत चुकीच्या धारणा ठेवून माल रोखण्याचे प्रकार झाले नाहीत. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत.’’ 
 
‘‘पुढील काळात बाजाराची वाटचाल दोन प्रमुख घटकांवर ठरणार आहे. एक, सध्याच्या तेजीमुळे उत्पादकांत काहीसा अतिआत्मविश्वास येणे आणि दुसरे, तापमान खाली येण्यामुळे पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहून वजनरूपी पुरवठा वाढणे, या टाळता येऊ शकणाऱ्या दोन बाबी बाजाराच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात,’’ असे डॉ. पेडगावकर म्हणाले.
 
सध्या नवरात्रीमुळे किरकोळ विक्री मंदीत आहे, पण संस्थात्मक (हॉटेल) विक्री जोरदार आहे, असे निरीक्षण नाशिकचे पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी नोंदवले. येत्या काळात दसरा सण डोळ्यांसमोर ठेऊन झालेली प्लेसमेंट बाजारात येईल. अर्थातच पुरवठा जास्त असेल पण मागणीही चांगली राहील, असेही ते म्हणाले.
 
एकादिवसीय वयाच्या पिलांचे (चिक्स) भाव पुन्हा उच्चांकी भावपातळीवर पोचले आहेत. प्रतिनगामागे ४१ रुपयांचा आकडा पार होताना दिसत आहे. सध्याच्या चिक्सच्या भावानुसार ओपन फार्मर्सचा उत्पादन खर्च प्रतिकिलो ६८ रुपयांच्या पार जाताना दिसत आहे. सध्याची प्लेसमेंट ४० दिवसांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल. 
 
सध्याच्या प्लेसमेंटबाबात खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, ‘‘पिलांचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असल्याने त्यांचे भाव मोठ्या तेजीत आहेत. पिलांच्या वाढत्या दरामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून, या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्लेसमेंटला मिळणारा मोबदला कितपत किफायती ठरेल, हे येत्या काळातील वातावरण कसे राहील, यावर अवलंबून आहे. ऑक्टोबर हीट, तापमानातील चढ-उतार, नोव्हेंबरमध्ये थंडी वाढली तर वजन लवकर येणे, अशा अनेक बाबी पुढील दिवसांत प्लेसमेंट करताना शेतकऱ्यांना लक्षात ठेवाव्या लागतील.’’
 
- दीपक चव्हाण.
 
पोल्ट्री दर
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ८० प्रतिकिलो नाशिक
अंडी ३४५ प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४१ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३० प्रतिनग मुंबई
मका १५०० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २५,००० प्रतिटन इंदूर

 

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com