वाढत्या उपलब्धतेमुळे बाजार सावध, तेजीबाबत साशंकता

साप्ताहिक पोल्ट्री
साप्ताहिक पोल्ट्री

येत्या आठवड्यात महाराष्ट्रासह उत्तर भारतात मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनुकूल वातावरणामुळे वाढती वजने, व्रतवैकल्ये कडकपणे पाळण्याचा ट्रेंड आणि आकस्मिक आंदोलनांमुळे ठप्प होणारा पुरवठा या तीन कारणांमुळे बाजारात तेजीबाबत साशंकता दिसते. नाशिक विभागात ब्रॉयलर कोंबड्यांचे लिफ्टिंग दर आठवडाभरात आठ टक्क्यांनी उतरले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी ५५ रु. प्रतिकिलो दराने लिफ्टिंग झाले. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात ६० रु. प्रतिकिलोच्या खाली लिफ्टिंग दर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मालास उठाव मिळत नाही. तुलनेने दक्षिण भारतातील बाजार किफायती आहे. उत्तर भारतात दीर्घकाळ सुरू असलेली पूर परिस्थिती, डेरा सच्चा सौदा अनुयायांचे आंदोलन आदी तत्कालिक कारणांमुळे उत्तर भारतातील अडचणींत भर पडली आहे. कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले की, गणपती विसर्जनानंतर खपात सुधारणा अपेक्षित आहे. सध्या चांगली मागणी आहे, पण उपलब्धताही वाढली आहे. नाशिक विभागातील माल गुजरात आणि मध्य प्रदेशात जातो. मात्र, सध्या तेथे पडतळ (पॅरिटी) बसत नसल्यामुळे माल मुंबईकडे वळता होत आहे. म्हणून महाराष्ट्रातील बाजार दबावात आहे. आजघडीला दक्षिणेकडून महाराष्ट्राला आधार मिळत आहे. हैदराबाद ७६, बंगळूर ७३, पल्लडम ७४, मिरज ६२ रु. प्रतिकिलो लिफ्टिंग भाव आहेत. मराठवाडा, सांगली विभागातील काही माल दक्षिणेकडे वळता होत आहे. त्यामुळे पुणे विभागाला व पर्यायाने महाराष्ट्रातील बाजाराला खालील पातळीवर आधार मिळाला आहे. गुजरात येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल म्हणाले, ‘‘की गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत घरगुती गणेश प्रतिष्ठापनेचे प्रमाण वाढत आहे. यंदा दीड दिवस, तीन दिवसांच्या गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. यामुळे चिकनचा खप श्रावणाप्रमाणेच कमी झालेला दिसत आहे. खरे तर प्लेसमेंट कमी असल्याने मालही कमी आहे. पुढच्या दिवसांत मागणी वाढली तरी ती पुरी करायाला पुरेसा माल नाही. पण, आजघडीला मात्र उठाव नाही. सध्या आणंद येथील बाजार महाराष्ट्रापेक्षा एक रुपयाने कमी दराने ट्रेड होत असल्यामुळे बाहेरून माल येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मागणी नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील मालाद्वारे गरज भागवली जात आहे. गणपती विसर्जनानंतर मागणी आणि दरात सुधारणा अपेक्षित आहे.’’ एका दिवसाच्या पिलांच्या (चिक्स) दरात वाढ झाली आहे. याबाबत खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, ‘‘सध्या दसरा ते दिवाळीच्या मध्ये माल विक्रीला येईल, या बेताने प्लेसमेंट सुरू आहे. ओपन फार्मर्स व इंटिग्रेटर्समध्ये प्लेसमेंटसाठी उत्साह आहे. चिक्सला चांगली मागणी आहे. सध्याची प्लेसमेंट ही खपाच्या दिवसांत येईल. यंदाचा श्रावण गेल्या वर्षीइतका खराब गेला नाही. श्रावण, गणपती, पितृपक्ष, नवरात्र या काळासाठी थांबविलेली प्लेसमेंट आता दसरा-दिवाळीसाठी पूर्ववत झाली आहे.’’ - दीपक चव्हाण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com