संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील; वादळी पावसाची शक्यता

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रावर गेल्या २ दिवसांत १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होता. आज आणि उद्या तो १००८ हेप्टापास्कल इतका राहील आणि तो कमीच असल्याने या कालावधीतही मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ३ ते ७ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेयकडून असल्याने वादळी वारे व पाऊस अशी स्थिती राहील. या शिवाय विजांच्या कडकडाटासह पाऊस होणे शक्‍य आहे. हा पाऊस पूर्वमोसमी पाऊस असल्याने दोन ते तीन तासांत पाऊस होऊन पुन्हा पावसात उघडीप अशी हवामान स्थिती राहणे शक्‍य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत ८ एप्रिल रोजी १५ ते ३० मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे शक्‍य आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतही १० ते १५ मिलिमीटर पाऊस होणे शक्‍य आहे. ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत पावसाचे प्रमाण तुरळक ठिकाणी अल्पशा प्रमाणात राहणे शक्‍य असून या काळात पावसाची शक्‍यता कमी राहील. याच कालावधीत मुंबई व उत्तर महाराष्ट्रात पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. ९ एप्रिलपासून हवेच्या दाबात १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढ होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होईल. हा पाऊस होण्यास मुख्य कारण म्हणजे हवेचा कमी होणारा दाब आणि हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढते तापमान यामुळे हा पाऊस होत आहे. साधारणपणे महाराष्ट्राच्या स्थितीचा आढावा घेतल्यास जून २०१७ पासून ते एप्रिल २०१८ पर्यंत प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येते. हा हवामान बदलाचाच एक भाग म्हणावा लागेल. कोकण ः ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ८५ ते ८७ टक्के राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९२ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील तर रत्नागिरी जिल्ह्यांत ४० टक्के राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ३८ टक्के राहील. कोकणात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर इतका कमी राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. सर्वच जिल्ह्यात २ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्र ः धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ टक्के राहील. तर नाशिक जिल्ह्यांत ४२ टक्के आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३९ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत केवळ १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील, तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. मराठवाडा ः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता असून बीड जिल्ह्यांत १४ मिलिमीटरपर्यंत तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३ ते ५ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता ७ एप्रिल रोजी आहे. ८ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात ३० मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात ४० मिलिमीटर व नांदेड जिल्ह्यात ३२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर औरंगाबाद जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर हिंगोली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना व नांदेड जिल्ह्यांत ६२ टक्के राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ टक्के इतकी राहील. लातूर व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५१ टक्के राहील व बीड जिल्ह्यात ५४ टक्के राहील. औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. तर वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत अग्नेयेकडून तर बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ ः अमरावती, वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत वायव्य व अग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ६० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के राहील. मध्य विदर्भ ः मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील. पूर्व विदर्भ ः चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस आणि गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत १८ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ३५ टक्के, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५० टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात ६५ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ टक्के राहील. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत १५ ते २० टक्के राहील तर चंद्रपूर जिल्ह्यात २५ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः सातारा व पुणे जिल्ह्यांत १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत १० ते ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व नगर जिल्ह्यांत ७ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ८ किलोमीटर राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील; तर उर्वरित जिल्ह्यात ते ३६ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित जिल्ह्यात २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८१ टक्के व पुणे जिल्ह्यात ४९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात ५९ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात १३ टक्के व कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात २३ ते २५ टक्के राहील.   कृषी सल्ला

  • उघड्यावर धान्य तसेच शेती उत्पादन असल्यास ते ताडपत्रीने झाकून घ्यावे.
  • फुले बाजारपेठेत पाठवायची असल्यास तोडणी करून लवकरात लवकर पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.
  • काढणीस आलेली फळे भाजीपाल्याची काढणी करून मालाची प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.
  • हळद व आले लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अाणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com