ब्लॉक पदे उघडणारा मंत्रालयातील महाभाग कोण?

ब्लॉक पदे उघडणारा मंत्रालयातील महाभाग कोण?
ब्लॉक पदे उघडणारा मंत्रालयातील महाभाग कोण?

पुणे  : कृषी खात्यामधील समुपदेशन बदल्यांमध्ये आयुक्तांनी पारदर्शकता ठेवत मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती. या पदांवर कोणाचीही नियुक्ती होणार नव्हती. मात्र, आयुक्तांनी यादी मंत्रालयात पाठविल्यानंतर सोनेरी टोळीने नजराणा तंत्र वापरून काही ‘ब्लॉक’ केलेली पदे ‘ओपन’ करून बदल्या करून घेतल्याचे आता उघड झाले आहे.   ब्लॉक केलेल्या तीन पदांवरदेखील नियुक्त्या झाल्या असून, आयुक्तांच्या यादीतील बारा अधिकाऱ्यांच्या भलत्याच ठिकाणी बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कोणत्या महाभागाने कोणाच्या सांगण्यावरून हा उद्योग केला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.   कृषी खात्यात वर्षानुवर्षे वेटोळे घालून बसलेल्या मलईखोरांना विस्तार कामासाठी गावाकडे पाठविण्यास काही प्रमाणात कृषी आयुक्तांना यशदेखील मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रिय पातळीवर काम कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पदोन्नत्या देण्याच्या जोरदार हालचाली आयुक्तांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

‘‘कृषी खात्याचा मुख्य हेतू विस्तार हाच असून त्यासाठी तालुका व गावपातळीवरील पदे भरण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे. मात्र, राज्यातील ३५१ तालुक्यांना कृषी अधिकारी नसल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी १४० तालुक्यांना कृषी अधिकारी देण्याचा प्रयत्न समुपदेशन बदली प्रक्रियेतून केला आहे. अर्थात, समुपदेशानंतरही तालुका कृषी अधिकारीपदाची ४० पदे रिक्त राहणार आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी तंत्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत आयुक्तांकडून विचार सुरू आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या मलईदार जागांसाठी सोनेरी टोळीच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीची परंपरा यंदा आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी मोडून काढली आहे. गोपनीय अहवाल ए प्लस असलेल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना नजराणा न देताही चक्क गुणवत्ता नियंत्रण विभागात बदली मिळाली आहे.

समुपदेशन प्रक्रियेतील प्रयोगशाळांना आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. प्रयोगशाळेचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रयोगशाळांमध्येच बदली देण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. तसेच, वर्षानुवर्षे ग्रामीण भागात अडगळीत राहिलेल्यांना मोक्याच्या जागी तर कायम मलईदार पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात पाठविण्याचे कौशल्य आयुक्तांनी समुपदेशन बदल्यांमधून साध्य केले आहे.

दरम्यान, कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी दर्जाच्या वर्ग दोन कनिष्ठ गटातील ३४५ बदल्यांची यादी शनिवारी दुपारपर्यंत प्रसिद्ध झालेली नव्हती. या यादीत देखील फेरफार केल्याचा संशय कर्मचाऱ्यांचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com