शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अभियान का नाही?

जागतिक बालिका दिन
जागतिक बालिका दिन

नाशिक : ‘‘शेती नीट पिकत नाही. पाणीही कमीच आहे. आई-वडील खूपच कष्ट करतात; पण त्यांचं मोल मिळत नाही. स्वत: चांगले कपडे घालत नाहीत, मात्र आम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत. सुटी दिवशी शेतात जाते, तेव्हा त्यांचे कष्ट पाहवत नाहीत. खूप शिकून त्यांचं स्वप्नं पूर्ण करणार आहे...’’ सातवीत शिकणारी साक्षी सांगत होती...

बुधवारी (ता. ११) जागतिक कन्या दिनानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींबरोबर अॅग्रोवनने संवाद साधला. यानिमित्त साक्षी आपले मत मांडत होती. कीटकनाशक फवारणीच्या घटनांतून १९ शेतकऱ्यांचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झालेत. साक्षी मनोहर जाधव (वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ) तेथीलच. साक्षी रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ गावातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते. तिचे वडील मनोहर पदवीपर्यंत शिकलेत. दहा एकरात कापूस, सोयाबीन, तूर अशी पिके घेतात. पाणी कमी, वीज वेळेवर नाही. शेतमालाला भाव नाही. याही स्थितीशी झुंजताहेत. छोट्या साक्षीला हातातोंडाची लढाई व्यथित करतेय.

ती म्हणते, शेतात गेलं की, फक्त वडिलांचे कष्टच दिसतात. बऱ्याचदा फी भरायला पैसे नसतात. वडील कुठूनतरी उभे करतात. मला फक्त अभ्यास कर म्हणतात. सरकार ‘स्वच्छता अभियान’ राबवतं, तसं शेतकरी मरू नये म्हणून का बरं अभियान चालवत नाही? तिचा हा प्रश्‍न निरुत्तर करतो. साक्षीला वनस्पती शास्त्रज्ञ व्हायचंय.

शेतमळ्यात वाढलेल्या, खेळलेल्या काही मुली गावांत, काही गावाजवळच्या शहरात शिकतात. कुणी वसतिगृहात राहून शिक्षण घेतंय. कुणी शिक्षण संपवून नोकरी करतंय. मात्र त्यांचं सगळं लक्ष शेताकडंच असतं. आई-वडिलांच्या अडचणींनी त्या हळव्या होतात. त्यांना आई-वडलांना सुखाचे दिवस दाखवायचेत.

पिंप्री खुर्दच्या (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) दहावीतील साक्षीचे वडील नाना पाटील प्रयोगशील शेतकरी आहेत. सेंद्रिय शेतीचे प्रयोग करतात. जिद्दीने शेतीत प्रगती साधणारे वडील तिचे आदर्श आहेत. तिला शेतीअभ्यासात शिक्षण घ्यायचंय. ‘उन्हाचा तडाखा वाढलाय. भागातील शेतकऱ्यांच्या कापूसफुटी एकाच वेळी आल्यात. वेचणीला मजूरच नाहीत’ अशी खंत ती मांडते. गरताडची (ता. चोपडा, जि. जळगाव) देवयानी संजय पाटीलला डॉक्‍टर व्हायचंय. ती म्हणाली, ‘आमची आठ बिघे शेती. कापूस, ऊस घेतो.

शेतीत पाणी कमी आहे. मजूर मिळत नाहीत. कापसाला क्विंटलला ४१०० रुपयांचा भाव तरीही या परिस्थितीत घर चालवणं आणि फी भरणं खूप अवघड होतंय.’

प्रणिता श्रीकांत पाटील ही निम शिरगावची (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) तरुणी शिरोळच्या रत्नाकर बॅंकेत नोकरी करतेय. तिनं बीएस्सी ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलंय. तिला कृषी अधिकारी व्हायचंय. घरी शेती तशी अडचणीचीच. प्रतिकूलतेतही वडिलांनी जिद्दीनं शिकवलंय.

ती म्हणते, ‘सगळे म्हणताहेत की शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. पण सामान्य शेतकऱ्याला ते परवडत नाही. तरीही मी कमी खर्चाचं तंत्रज्ञान शेतीत वापरण्यावर भर देते. त्यातूनच ‘ठिबक’चा आग्रह धरला. माती पाणी परीक्षण करून जैविक खतांचा वापर करते. त्याचे चांगले परिणाम मिळालेत.’

शेती कुठेही कमी नाही शेतकऱ्याची मुलगी असल्याचा अभिमान आहे. मला सात बहिणी आहेत. त्यांची लग्ने वडिलांनी केवळ शेतीतील उत्पन्नावर केलीत. होय! मन लावून केली तर शेती आधार नक्कीच देते. देवगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऐश्‍वर्या बाळू हांडगे सांगत होती. ती म्हणाली, ‘मी आता बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेते. पदवीनंतर मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करून शासकीय सेवेत जायचं आहे.’ ऐश्‍वर्याच्या सोबत शिकणाऱ्या मानसी राजकुमार बर्गे (कोरेगाव, जि. सातारा), पूजा ज्ञानेश्‍वर गायकवाड (नारायणगाव, पुणे), प्राजक्ता प्रवीण कदम (राहाता, जि. नगर), अनिता भाऊसाहेब कढणे (चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. नगर) यांनीही शेतीपुढील आव्हाने पाहता त्याला तोंड देण्यासाठी योगदान देण्याची तयारी दाखवली आहे.

शहरातील मुलींच्या तुलनेत आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलींवर बंधने अधिक असतात. मात्र समजून घेणं, संधी देणं, स्वातंत्र्य देणं याबाबत आई-वडिलांमध्ये जाणीव वाढली आहे. - मानसी बर्गे, कोरेगाव, जि. सातारा.

शेतीतील सततची अस्थिरता पाहता आमच्या पालकांनाही वाटतं, की मुलीला स्थिर पगाराची नोकरी असलेलं स्थळ मिळावं. त्यात त्यांची काळजीच असते. मात्र, आताच्या अनिश्‍चिततेत नोकरी व शेती दोन्हीही महत्त्वाचे आहे. - अनिता कढणे, चंदनापुरी, जि. नगर

नवीन तंत्रज्ञान, आधुनिक वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. विस्ताराचे काम फारसे होत नसल्याने शेती अडचणीत आहे. - प्राजक्ता कदम, राहाता, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com