रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न सुटणार?
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न सुटणार?

रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न सुटणार?

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीतील युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसाठी त्यांचा भाजप प्रवेश अडचणीचा ठरणार आहे. पण मूळ मुद्दा आहे, तो पक्षप्रवेशासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या योजनेचा, खरंच तो सुटणार आहे?  माजी उपमुख्यमंत्री आणि माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री असताना २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालवले, कृष्णा-भीमेतील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वळवून ते पुढे मराठवाड्याला देण्याची ही योजना आहे. पण तांत्रिक आणि भौगोलिकदृष्ट्या ही योजना शक्य आहे का नाही, यावरच त्याचं घोडं अडलं, पण मोहिते पाटील यांनी त्याची फिकीर केली नाही, त्यांनी मात्र या योजनेचं घोडं प्रत्येकवेळी दामटून नेलं. आजही अनेक कार्यक्रमात स्वतः विजयसिंह किंवा रणजितसिंह या विषयावर बोलले नाहीत, असं होत नाही. एवढा पाठपुरावा सतत ते करत आले आहेत. अर्थात, या योजनेचं भवितव्य आजही टांगणीला आहे. पण आज पुन्हा याच प्रश्नावर त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.  सत्ताकारणासाठी शेतकरी आणि त्यांचे प्रश्न राजकीय पुढाऱ्यांना नेहमीच जवळचे वाटतात आणि वेळेवर आठवतातही, त्याची चर्चाही चांगलीच रंगते. आज तशीच चर्चा मोहिते पाटलांच्या प्रवेशाने रंगली आहे. पण मोहिते पाटील यांनी शेतकरी हित म्हणून की राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपप्रवेश केला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे खरंच शेतकरी हिताचा हा प्रश्न आता तरी सुटणार आहे का? असा प्रश्न भाबड्या शेतकऱ्यांना पडला आहे.  शेतकरी संघटनांचा आवाज बसला  गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या मतदारसंघाची जागा देऊन याठिकाणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उतरवण्यात आले होते. पण स्वतः खोत यांनीच स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन स्वतःची संघटना काढली. तर स्वाभिमानीनेही युतीची साथ सोडली. पण आज बळिराजा शेतकरी संघटनेने इथे उमेदवारीची घोषणा केली आहे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकरांना त्यासाठी उमेदवारी दिली आहे. बळिराजा वगळता स्वाभिमानी किंवा अन्य शेतकरी संघटना मात्र कोणीच निवडणुकीच्या रणांगणात उतरायला तयार नाहीत. त्यामुळे एरव्ही राजकारण्यांच्या विरोधात लढण्याच्या वल्गना करणाऱ्या शेतकरी संघटनांचा आवाज बसल्याचे चित्र आहे. माढ्याच्या लढतीकडे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले खच्चीकरण ओळखून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला. लोकसभेसाठीही भाजप त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवेशावेळी दिले आहेत. मोहिते पाटील घराण्याचे या भागातील राजकीय वर्चस्व पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसला आता त्याच ताकदीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही राजकीय खेळी करणार आहे. भाजपचे सहयोगी सदस्य असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील विरुद्ध संजय शिंदे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com