पुढचा हंगाम सुरक्षित होईल का?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : गुलाबी बोंड अळीने कपाशी उत्पादकांसह सर्वांचीच झोप उडविली आहे. एवढे सगळे घडल्यानंतर  यंदाचा हंगाम या अळीने फस्त केल्याने निदान पुढचा हंगाम सुरक्षित राहील, यासाठी काही उपाययोजना किंवा कपाशीच्या एवढ्या क्षेत्रासाठी पर्यायी पीक कोणते याचे काही नियोजन होईल का? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.

गुलाबी बोंड अळीने यंदा मराठवाड्यातील जवळपास १५ लाख ६५ हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाला आपले लक्ष्य केले. आधी ऑगस्ट, त्यानंतर यंदा जुलैच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच बोंड अळीचे आक्रमण निदर्शनास आले होते. तसे बीटी तंत्रज्ञान येण्यापूर्वी त्रस्त करून सोडणारी ही अळी या तंत्रज्ञानालाही भारी पडल्याचे शेतकरी सांगतात. शासनाकडून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांकडून जे फॉर्मच्या माध्यमातून तक्रारी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, सरकीच नसलेल्या कापूस वेचनीचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी ''वेचणी''पेक्षा मोडणीवर भर देणे सुरू केले आहे.

अपवादात्मक ठिकाणी कपाशीची फरदड घेण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यामध्ये होणारे उत्पादन खर्चाला परवडणारे नसल्याचे चित्र गुलाबी बोंड अळीच्या आक्रमणाने निर्माण झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यंदा झालेल्या नुकसानभरपाईसाठी शासनाने पावले उचलावीत व निदान पुढचा हंगाम कसा सुरक्षित करता येईल यावर तातडीने उपाययोजन्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

बोंडासहित रोटा मारणेही अडचणीचे ज्या बोंड अळ्या कोषावस्थेपर्यंत गेल्या, त्या जमिनीत जशाच्या तशा गाडल्या गेल्यास त्या सुप्तावस्थेत जाण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रात पुन्हा कपाशीचे पीक घेतल्यास व आवश्‍यकतेनुसार गॅप न पडल्यास गुलाबी बोंड अळीचे आक्रमण पुढील वर्षी पुन्हा सुरवातीपासूनच येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडासहित असलेल्या कपाशीमध्ये रोटावेटर फिरविल्यास किमान त्या क्षेत्रामध्ये पुन्हा कपाशी घेणे टाळावे, फरदड घेणे कटाक्षाने टाळावे, अळीच्या पहिल्या पिढीचा विस्तार पुढील वर्षी सुरवातीपासूनच नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरजही तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे.

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने वेधले होते लक्ष जालना जिल्ह्यातील नळविहिऱ्याच्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने थेट कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना ५ मार्च २०१६ रोजी खरीप २०१५ मध्ये बीटी कापसावरील कीड रोग प्रादूर्भावासंदर्भात पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यावर कृषी मंत्रालयाने सहायक महानिर्देशक (वनस्पती संरक्षण) भारतीय कृषी संशोधन परिषदेला २० मार्च २०१६ ला पत्र पाठविले होते. त्याचे निरसन लिखित स्वरूपात निवेदनकर्त्याला पाठविण्याचे सांगितले होते. त्या पत्राचा संदर्भ देऊन सहायक महानिर्देशक (वा.फ) डॉ. आर. के सिह यांनी निवेदनकर्ते ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे यांना विस्तृत माहिती दिल्याचे पत्र ५ जुलै २०१६ ला रवाना केले. या पत्रात उच्च गुणवत्तेचे बियाणे खरेदी करा, रेफ्युजी लागवड, वेळेत लागवड, विविध सापळे, संमिश्र कीटकनाशकाचा प्रयोग न करणे आदी नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांशिवाय विशेष काही कळविण्यात आले नव्हते, असे संजय मोरे पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com