मराठवाड्यात यंदा रब्बी हंगाम जोमात

समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात रब्बीतील उत्पादन आणि उत्पादकता वाढ शक्य आहे. - एस. एल. जाधव, कृषी संचालक
मराठवाड्यात यंदा रब्बी हंगाम जोमात
मराठवाड्यात यंदा रब्बी हंगाम जोमात

मुंबई ः तीन दशकांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात गेल्या वर्षी रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ आली होती. यंदा मात्र परिस्थिती बदलली अाहे. समाधानकारक पावसामुळे रेल्वेने पाणी आणण्याची गरज पडणार नसल्याचे चित्र आहे. जमिनीत ओलसरपणा राहणार असल्याने येत्या रब्बी हंगामात भरघोस उत्पादनाचा सूत्रांचा अंदाज आहे. याचबरोबर उन्हाळी पिकांनाही जायकवाडीचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरअअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. काही धरण आणि नद्यांमध्ये तर मागील काही वर्षांत पाहिला नसेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे. परिणामी येत्या रब्बी हंगामात जमिनीत ओलावा राहण्याची शक्यता असून, उत्पादनवाढ होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि हिंगोली या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना भौगोलिक स्थितीमुळे दुष्काळप्रवण समजले जाते. यंदा नऊ वर्षांनंतर प्रथमच येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. तसेच मांजरा धरणही ९९ टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस जास्त झाला होता. मात्र पाणी वाहून जाणे, जमिनीत मुरणे, विषम धरणक्षेत्रस्थिती आदी कारणांमुळे या पाण्याचा फारसा लाभ झाला नाही.

यंदा जून आॅगस्टमध्ये येथे सरासरीच्या ८४ टक्के पाऊस जास्त झाला. सप्टेंबरमधील पावसाची सरासरीही ९० टक्क्यांवर राहिली आहे. यामुळे मराठवाड्यातील ४४ प्रमुख धरणांत ७३ टक्के जिवंत पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. गेल्यावर्षी तो ४७ टक्के होता. ८० मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ५२ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी तो ३८ टक्के होता. या पाण्यामुळे विभागातील उसालाही लाभ मिळणार आहे. मराठवाड्यात महाराष्ट्राच्या सुमारे २० टक्के ऊसक्षेत्र आहे.

वाल्मीचे माजी प्राध्यापक प्रदीप पुरंदरे म्हणाले, की जर कालव्यांची डागडुजी आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले, तर जायकवाडीच्या पाण्याचा अतिरिक्त दीड लाख हेक्टराला लाभ मिळू शकतो.

रब्बी हंगामात मराठवाड्यातील शेतकरी प्रामुख्याने चणा, ज्वारी, गहू आणि मका आदी पिके घेतात. या पिकांचे क्षेत्र वाढण्याची आशा आहे. पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरानंतरची स्थिती पाहून जायकवाडीतील पाणीसाठा रब्बीनंतर उन्हाळी पिकांनाही सिंचनकामी उपयोगी पडणार आहे. यासाठी त्यावेळच्या स्थितीनुसार मिळणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भूजलपातळी वाढत असल्याने शेतकरी यंदा निश्चितच पीक लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याच्या प्रयत्न करतील, असे जालना येथील शेतकरी कैलास म्हात्रे यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com