शेतकरी कंपन्यांमध्येही महिलांनी उमटवला ठसा

आम्ही दोन वर्षांपूर्वी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. सध्या कंपनीत सात गावांतील सहाशे महिला सदस्य आहेत. डाळमिल व ग्रेडिंग, क्लिनिंग प्रकल्प सुरू केला आहे. कंपनीची वार्षिक तीस लाखांची उलाढाल आहे. - अनिता योगेश माळागी, अध्यक्ष, यशस्विनी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी, बोरामनी, सोलापूर
सोलापूर येथील महिलांनी सुरू केलेली यशस्विनी शेतकरी उत्पादक कंपनी.
सोलापूर येथील महिलांनी सुरू केलेली यशस्विनी शेतकरी उत्पादक कंपनी.

पुणे ः इतर क्षेत्रांप्रमाणेच शेती व प्रक्रिया उद्योगातही महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या म्हटले की पुरुष शेतकरीच डोळ्यासमोर येतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांनी याला फाटा देत आपला ठसा शेतकरी कंपन्यांमध्येही उमटला आहे. मागील तीन वर्षांपासून ग्रामीण भागातील दोन हजार २७३ महिलांनी एकत्रित येऊन महिलांच्या नऊ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासोबतच त्यांनी सक्षमतेकडे वाटचाल सुरु केली आहे.  जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत एकूण ४१२ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. यात महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या नऊ शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. या उत्पादक कंपन्यांमार्फत महिला कृषीविषयक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता, बिजोत्पादन कार्यक्रम, उत्पादित कृषीमालाची एकत्रित विक्री आणि साठवणुकीच्या सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच बाजाराभिमुख कृषीविस्ताराचे काम प्रभावीपणे करत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून महिलांनी दालमिल, हळद प्रकिया, राईसमिल, चिंच प्रक्रिया, मसाले उत्पादने, काजू प्रक्रिया, नाचणी प्रक्रिया असे प्रकल्प सुरू केले आहेत. या कंपन्यांना आर्थिक मदत म्हणून सुमारे एक कोटी २१ लाख ५० रुपये अनुदानापोटी दिले आहेत. त्यामुळे महिला स्वावलंबी होऊ लागल्या आहेत. त्याअंतर्गत महिलांना कृषी विभागाअंतर्गत विविध अभ्यास दौरे, खरेदीदार विक्री संमेलने, जिल्हा कृषी महोत्सव, काढणीपश्च्यात तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रात्यक्षिके, बाजाराभिमुख प्रात्यक्षिके इत्यादी घटकांच्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी करण्यात आली असून, तंत्रज्ञान व शेतीमालाच्या विक्रीची साखळी तयार केली जात आहे.  अशा आहेत महिला शेतकरी कंपन्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथे स्थापन केलेल्या कृषिकन्या शेतकरी उत्पादक कंपनीत ३७१ महिला सहभागी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बोरामनी येथील यशस्विनी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीत ४६४ महिला, नंदुरबार येथील नंदनगरी शेतकरी उत्पादक कंपनीत १८०, हिंगोलीतील धानोरा येथील प्रज्ञा शील करुणा शेतकरी उत्पादक कंपनीत १७०, औरंगाबादमधील पूर्णा महिला शेतकरी कंपनीत १५०, कोल्हापूरातील आजरा येथील जिव्हाळा ॲग्रो शेतकरी कंपनीत १६७, सातारा जिल्ह्यातील साखरवाडी (ता.फलटण) येथील फलटण तालुका महिला शेतकरी उत्पादक कंपनीत ३५०, रत्नागिरी जिल्ह्यातील साखळे (ता.खेड) येथील रत्नदुर्ग अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीत २९६, नगर जिल्ह्यातील राहाता येथील पुण्यस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीत १२५ महिला सहभागी झाल्या आहेत. 

प्रतिक्रिया महिलांची कंपनी स्थापन केल्यामुळेनंतर ग्रेडिंग, क्लिंनिग, त्याचबरोबर कॅटल फिल्ड प्रकल्प सुरू केला आहे. कंपनीच्या माध्यमातून तूर, मका खरेदी तसेच बियाणे, खते कमी दराने महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे उपक्रम राबविले आहेत. कंपनीची ४० ते ५० लाखांची उलाढाल होत आहे.  - सुनिता धनवटे , अध्यक्ष, पुण्यस्तंभ महिला शेतकरी उत्पादक कंपनी, पुणतांबे, नगर      

शेतीमालाला चांगला दर मिळावा, या उद्देशाने कंपनी स्थापन केली आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बियाणांचे कमी दरात वाटप, शेती मशागत ते पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर कमी दरात उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे महिलांच्या आर्थिक खर्चात मोठी बचत झाली असून, महिलांच्या शेतीमालाला चांगले दर मिळू लागले आहे.  - ज्योती धनंजय वाघमारे, अध्यक्ष, प्रज्ञा शील करुणा महिला शेतकरी उत्पादक कंपनी, हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com